माझ्या नवऱ्याची बायको… एक पत्नी पाकमध्ये, आता दिल्लीच्या तरूणीशीही साखरपुडा; कराचीतून पहिल्या पत्नीची मदतीसाठी आर्त हाक
पाकिस्तानातील एका महिलेने मदतीसाठी विनंती केली आहे. माझा नवरा मला पाकिस्तानात सोडून भारतात गेला असं तिचं म्हणणं आहे. आता दिल्लीतील एका मुलीशी त्याचं लग्न ठरल्याचाही तिचा दावा आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण , जाणून घेऊया..

पहलगाममध्ये झालेल्या मधील दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.भारतातील अनेक पाकिस्तानी नागरिकांना सरकारने त्यांच्या मायदेशी परत पाठवलं आहे. मात्र याच दरम्यान एका पाकिस्तानी महिलेने भारताकडे मदत मागितली आहे. आपलं वैवाहिक जीवन उध्वस्त होऊ नये म्हणून तिने मदतीची याचना केली आहे. तिचा पती तिला पाकिस्तानात सोडून भारतात गेला आणि आता मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राहतो. एवढंच नव्हे तर पहिलं लग्न झालेलं असूनही तो आता दिल्लीतल्या एका तरूणीशी लग्न करणार असून त्यांचा साखरपुडा झाल्याचाही दावा त्या महिलेने केला.
त्या महिलेच्या दाव्यानुसार, तिचा नवरा हा लाँग टर्म व्हिसा घेऊन बऱ्याच काळापासून मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राहतोय. पाच वर्षांपूर्वी त्याचे लग्न पाकिस्तानातील कराची येथील एका महिलेशी झाले. तो एकदा त्याच्या पत्नीला भारतात घेऊन आला होता, पण काही काळानंतर त्याने तिला परत पाकिस्तानला पाठवले. तेव्हापासून मी माझ्या पतीच्या परत येण्याची वाट पाहत आहे, असं म्हणत त्या महिलेने आपबिती सांगितली. त्याचदरम्यान, मला कळलं की माझ्या नवऱ्याचे दिल्लीतील एका मुलीशी लग्न ठरले आहे. तो लवकरच तिच्याशी लग्नही करेल. हे सांगत पीडित महिलेने इंदूरमधील सामुदायिक पंचायतीला तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न थांबवण्याची विनंती केली आहे.
पंचायतीकडे केली मदतीची मागणी
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर पंचायतीने इंदूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. यामध्ये त्या तरूणाला पाकिस्तानात परत पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तरुणाने भारतात नियमांविरुद्ध बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याचेही त्यांनी नमूद केलं. या पाकिस्तानी नागरिकाचे नाव विक्रम कुमार नागदेव असून तो गेल्या 12 वर्षांपासून इंदूरमध्ये राहत आहे. विक्रमने 2020 साली कराची येथील रहिवासी निकिता हिच्याशी लग्न केले. त्यानंतर एका महिन्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये तो निकितालाही भारतात घेऊन आला. पण व्हिसाच्या काही समस्यांमुळे निकिताला जुलै 2020 मध्ये कराचीला परत पाठवण्यात आले.
त्यानंतर विक्रमने मला भारतात घेऊन जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, पण तो स्वतः भारतात राहत होता, असा निकिताचा आरोप आहे. मी विक्रमला खूप वेळा सांगितले की मलाही तुमच्याकडे यायचे आहे. पण तो मला भारतात नेणं पुढे ढकलत राहिला, असं निकिता म्हणाली. आता मला कळलं की विक्रमचे दिल्लीतील शिवांगी धिंग्रा नावाच्या मुलीशी सारखपुडा झालाय, तो लवकरच तिच्याशी लग्न करणार आहे.
महिलेकडून मदतीची विनंती
15 जानेवारी 2025 रोजी, पाकिस्तानातील निकिताने तिचा पती विक्रमबद्दल सिंधी आर्बिट्रेशन अँड लीगल कन्सल्टन्सी सेंटर, इंदूर येथे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केली. मात्र तिला इंदूरला येऊन तक्रार करावी लागेल, असे पंचायतीतर्फे तिला सांगण्यात आलं. मात्र निकिताने भारतात येण्यास नकार दिला आणि म्हणाली- मला पाकिस्तानमधूनच सुनावणी हवी आहे. आमचं लग्न पाकिस्तानात झालं होतं. पती-पत्नी दोघेही पाकिस्तानचे रहिवासी आहेत, म्हणून पाकिस्तानी कायदा तुम्हा दोघांनाही लागू होतो. दोघेही घटस्फोट घेण्यास आणि दुसरं लग्न करण्यास कायदेशीररित्या मुक्त आहेत.
विक्रमला देशातून काढलं पाहिजे
मात्र यावर पंचायतीचं असं म्हणणं आहे की, गैर भारतीय नागरिक विक्रम कुमार नागदेव हे माणिकबाग रोडवरील B-201 ऑरेंज कंट्री येथे राहतो. केएन सन्स 488, जवाहर मार्ग येथे तो बिझनेस करतो. त्याने नियमांविरुद्ध आणि भारत सरकारच्या परवानगीशिवाय येथे मालमत्ता खरेदी केली आहे. विक्रम आणि निकिता यांचे लग्न कराचीमध्ये हिंदू पद्धतीने झाले. विक्रम भारतीय कायदा आणि सामाजिक परंपराही पाळत नाही. अशा परिस्थितीत, महिलेने कराची न्यायालयात तिच्या हक्कांसाठी न्याय मागणे योग्य ठरेल. त्याच वेळी, भारत सरकारने लादलेल्या निर्बंधांनुसार विक्रमला हद्दपार केले पाहिजे, असेही त्याचं म्हणणं आहे. या प्रकरणात पुढे काय होते हे येणारा काळच सांगेल.
