आता सहन होत नाही… मुलाला अनेक अनेक आशीर्वाद… कमला पसंदच्या मालकाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल, त्या संध्याकाळी काय घडलं?
Deepti Chaurasia Death : प्रसिद्ध पान मसाला कंपन्या कमला पसंद आणि राजश्री यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया यांनी आत्महत्या केली आहे. आता दीप्ती यांची एक डायरी समोर आली आहे, ज्यात गंभीर आरोप करण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपन्या कमला पसंद आणि राजश्री यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया यांनी आत्महत्या केली आहे. दीप्ती यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहार येथील राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. दीप्ती यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डायरी जप्त
दीप्ती चौरसिया यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह पती हरप्रीत चौरसिया यांनी सर्वप्रथन पाहिला. हरप्रीत यांनी दीप्ती यांना रुग्णालयात नेते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. या डायरीत दीप्ती यांनी पतीसोबतच्या वादाबाबत माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे आता या आत्महत्येबाबत उलगडा होण्यास मदत होणार आहे.
जर नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर…
दीप्ती आणि तिचा पती वेगवेगळ्या घरात राहत होते. दीप्ती यांनी या डायरीत लिहिले आहे की, ‘जर नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर त्या नात्यात राहण्यात आणि जगण्याचे कारण काय? मी आता सहन करू शकत नाही. माझ्या मुलाला आईचा आशीर्वाद.’ त्यामुळे आता या आत्महत्येमागे पती कारणीभूत असल्याचे समोर येताना दिसत आहे.
दीप्ती आणि हरप्रीत चौरसिया यांते लग्न 2010 मध्ये झाले होते. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आहे. हरप्रीतचे आणखी एक लग्न झालेले आहे. त्याची दुसरी पत्नी दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेत्री आहे. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. दीप्ती यांच्या भावाने आता हरप्रीत आणि त्यांच्या आईवर गंभीर आरोप केला आहे.
नातेवाईकांचा गंभीर आरोप…
दीप्ती चौरसियाचा भाऊ ऋषभ यांनी म्हटले की, ‘दीप्तीचा नवरा आणि सासू तिला मारहाण करायचे. माझ्या मेहुण्याचे अनेक अवैध संबंध होते. लग्नापासून त्यांचे नाते चांगले नव्हते. 2011 मध्ये माझ्या भाच्याच्या जन्मानंतर आम्हाला समजले की, माझा मेहुणा माझ्या बहिणीला मारहाण करतो. त्यामुळे आम्ही माझ्या बहिणीला माहेरी आणले होते, मात्र तिची सासू तिला परत घेऊन गेली. माझ्या बहिणीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली हे माहित नाही, आम्हाला न्याय हवा आहे.’
