आता ट्रॅफिकच्या कटकटीतून कायमची सुटका… पंतप्रधान मोदी करणार 11000 कोटींच्या हायवे प्रकल्पाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (उद्या) दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या हायवे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राजधानी दिल्लीकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (उद्या) दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या हायवे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी ते जनतेला संबोधित करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या प्रकल्पांचे उद्घाटन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या द्वारका एक्सप्रेसवे आणि दिल्ली विभागातील शहरी विस्तार रस्ता-2(यूईआर-2) या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमुळे दिल्ली आणि आसपासच्या भागातील वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ कमी होणार असून गर्दीपासून मुक्तता होणार आहे. यातून पंतप्रधान मोदींचा देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या मिशनच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे.
कनेक्टिव्हिटी वाढणार
द्वारका एक्सप्रेसवे हा 10.1 किमी लांब मार्ग सुमारे 5360 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा विभाग यशोभूमी, दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन आणि ऑरेंज लाईन, बिजवासन रेल्वे स्टेशन आणि द्वारका क्लस्टर बस डेपोला मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. यात दोन पॅकेजेस समाविष्ट आहेत. पहिला मार्ग शिवमूर्ती चौक ते द्वारका सेक्टर-21 च्या रोड अंडर ब्रिजपर्यंतचा 5.9 किमी मार्ग आहे. तर दुसरा द्वारका सेक्टर-2आरयूबी ते दिल्ली-हरियाणा सीमेपर्यंतचा 4.2 किमीचा आहे. हा अर्बन एक्सटेंशन रोड-2 ला जोडेल.
नवीन लिंक मार्गांचे उद्घाटन होणार
द्वारका एक्सप्रेसवेच्या 19 किमी लांबीच्या हरियाणातील भागाचे PM मोदींनी मार्च 2024 मध्ये उद्घाटन केले होते. उद्या पंतप्रधान मोदी दिल्लीतील अलीपूर ते दिघव कलान या विभागाचे आणि बहादुरगड आणि सोनीपतला जोडणाऱ्या नवीन लिंक मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 5580 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या मार्गामुळे दिल्लीच्या इनर आणि आउटर रिंग रोड, मुकरबा चौक, धौला कुआ आणि राष्ट्रीय महामार्ग-9 वरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या मार्गांमुळे बहादूरगड आणि सोनीपतकडे थेट प्रवेश करता येणार आहे, जेणेकरून दिल्लीतील वाहतुकीचा भार कमी होणार आहे.
