परीक्षेचं टेन्शन नकोच… ज्या विषयाची भीती त्याची आधी तयारी करा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.

PM Narendra Modi Pariksha Pe Charcha 2025 : सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे. पेपर कसे जातील याची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेतानाही दिसत आहेत. आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पाहा, असं सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते, त्या विषयाची आधी तयारी करा, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोदींनी त्यांच्याशी भाष्य केले. हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.
Had a wonderful interaction with young students on different aspects of stress-free exams. Do watch Pariksha Pe Charcha. #PPC2025. https://t.co/WE6Y0GCmm7
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
|
नेतृत्व गुण विकसित करा
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देतानाच नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे सुद्धा सांगितलं. लीडरला टीम वर्क शिकणं महत्त्वाचं आहे. कुणाला काम दिलं असेल तर त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. जिथे कमी, तिथे आम्ही हा सिद्धांत तुम्ही मनात बिंबवून ठेवा. लोकांचा विश्वासच तुमच्या लीडरशीपला मान्यता देईल, असं मोदी म्हणाले.
आव्हानांचा सामना करा
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला 30 मार्क होते, तर तुम्हाला यावेळी 35 मार्क मिळवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे. असं करून तुम्ही तुमचं टार्गेट वाढवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.
आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
यावेळी एका विद्यार्थ्याने परीक्षा जवळ आल्यावर वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले. “वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करता आला पाहिजे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करावे. विनाकारण वेळ घालवू नका. गप्पांमध्ये किंवा इतर विषयांवर बोलण्यापेक्षा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अभ्यासाची तयारी करताना व्यवस्थित जेवण करा. पुरेशी झोप घ्यायला पाहिजे”, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.