अनेक तक्रारी असूनही…अहमदाबाद विमान अपघातानंतर राज ठाकरेंचा मोठा सवाल; DGCA ला घेरलं!
राज ठाकरे यांनी डीजीसीएचा कारभार तसेच अपघातग्रस्त ड्रमलाईनर या विमानाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी डीजीसएला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Raj Thackeray And Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथील विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. संपूर्ण भारतभरातून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील मनसे या दु:खात सहभागी आहे, असं सांगितलं आहे. पण सोबतच राज ठाकरे यांनी डीजीसीएचा कारभार तसेच अपघातग्रस्त ड्रमलाईनर या विमानाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी डीजीसएला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. जगभरात ड्रिमलाईनर या विमानांची उड्डाणं थांबवली जात असताना या विमानाला उड्डाण घेण्यास तसेच 40 हून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर देण्यास सरकारने परवानगी का दिली ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली
अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं
विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं, अशी माहिती त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये दिलीय.
कधीच कोणती कारवाई का नाही केली ?
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं, असंही राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये सांगितलंय.4
40 हून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर
ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली… आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
कुठलाही दबाव न सहन करता…
ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा, असा सल्ला राज ठाकरे यांनी समस्त भारतवासीयांना दिलाय.
