तेलंगणासाठी मंजूर करण्यात आलेल्या तीन प्रमुख संस्थांना Centres of Excellence म्हणून मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणासाठी मंजूर करण्यात आलेल्या तीन प्रमुख संस्थांना उत्कृष्टता केंद्रे Centres of Excellence म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणासाठी मंजूर करण्यात आलेल्या तीन प्रमुख संस्थांना उत्कृष्टता केंद्रे Centres of Excellence म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री व भाजपा तेलंगणा प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले जी. किशन रेड्डी?
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तेलंगणामध्ये अनेक महत्वाच्या केंद्रीय संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यात पायाभूत सुविधा, विकास, संशोधनाला चालना आणि लोककल्याणकारी धोरणांची अंमलबजावणी या सर्व बाबींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. संशोधन केंद्रे, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आणि कृषी क्षेत्रातील प्रगती या सर्वांमधून केंद्राचा तेलंगणाच्या समावेशक विकासाबाबतचा दृढ संकल्प स्पष्टपणे दिसून येतो.
जागतिक उत्कृष्टता केंद्र – बाजरी (मिलेट्स)
बाजरीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक देशांबरोबर सामंजस्य करार (MoU) केले आहेत, कृषी मंत्रालयाद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत. तेलंगणामध्ये भारतीय बाजरी संशोधन संस्था (IIMR) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. ICAR अंतर्गत IIMR द्वारे बाजरीवर संशोधन आधीच सुरू आहे. आता कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून 250 कोटी रुपये खर्चून ‘जागतिक उत्कृष्टता केंद्र – बाजरी’ ची स्थापना केली जाणार आहे. हे केंद्र बाजरी संशोधनाला अधिक बळकटी देणार आहे. हे केंद्र पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर संशोधन, विकास आणि पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार होईल. या केंद्रात सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅब, आंतरराष्ट्रीय वसतिगृह, बाजरी संग्रहालय, संशोधन शेत, प्रशिक्षण कक्ष व आंतरराष्ट्रीय अतिथीगृह आदी सुविधा उभारल्या जातील. त्याचबरोबर जीन एडिटिंग ग्रीनहाऊस, स्पीड ब्रीडिंग लॅब्स आणि फिनोमिक्स लॅब्स यांसारख्या आधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. विशेषतः तेलंगणातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बाजरी बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. हे नवीन केंद्र शेतकऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण, मूल्यवर्धित उत्पादनांच्या विपणनास पाठिंबा आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देईल, असं यावेळी जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
‘कवच’ उत्कृष्टता केंद्र – सिकंदराबाद
भारतातील स्वदेशी रेल्वे सुरक्षा तंत्रज्ञान – ‘कवच’ च्या विकासासाठी समर्पित, संशोधन डिझाईन आणि मानक संघटना (RDSO) ‘कवच’च्या तांत्रिक बाबी हाताळते, तर नवीन उत्कृष्टता केंद्र हे संकल्पनात्मक केंद्र म्हणून कार्य करेल. यासाठी 41.11 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, IIT-चेन्नईच्या सहकार्याने 28.46 कोटींचं 5G तंत्रज्ञान तपासणी केंद्र याठिकाणी उभारलं गेलं आहे.274 कोटी रुपयांचा खर्च करून केंद्र सरकार या केंद्राचा विस्तार करणार असल्याची माहिती जी. किशन रेड्डी यांनी यावेळी दिली आहे.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) – हैदराबाद
केंद्र सरकारच्या 60,000 कोटींच्या ‘विकसीत भारत’ योजनेंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (ITI) दर्जा सुधारण्यासाठी उचलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुधारणा आणि पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांच्या (NCOE) स्थापनेसाठी नवीन केंद्र प्रायोजित योजना लागू केली जाणार आहे. भारतभरातील पाच NSTI संस्थांमध्ये अधोरेखित पायाभूत सुविधा व प्रशिक्षणात सुधारणा केली जाणार आहे.या माध्यमातून 50,000 प्रशिक्षकांना पूर्व सेवा व सेवेत असतानाचा प्रशिक्षण दिला जाईल. या पाच प्रशिक्षण केंद्रांसाठी एकूण 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी जी. किशन रेड्डी यांनी दिली आहे.