Jaishankar : आम्हाला काय करायचय हे कोणी…शेजारी देशांबाबतच्या भारताच्या धोरणावर जयशंकर यांची रोखठोक भूमिका
Jaishankar : "भारताचा विकास ही एक वाढत जाणारी लाट आहे, याची आमच्या बहुतांश शेजाऱ्यांना जाणीव आहे. भारताने प्रगती केली, तर आमच्यासोबत शेजारी देश सुद्धा प्रगती करणार. मी हाच संदेश घेऊन बांग्लादेशात गेलो होतो"

बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती आणि भारताच्या शेजारी देशांबाबतच्या धोरणावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलले आहेत. “मी दोन दिवसांपूर्वी बांग्लादेशमध्ये होतो. मी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्कारावेळी भारताकडून उपस्थित होतो. यावेळी आम्ही अनेक शेजऱ्यांना भेटलो. जर, तुमचा कुठला शेजारी तुमच्यासाठी चांगला आहे किंवा कमीत कमी तुमचं नुकसान चिंतणारा नसेल, तर स्वाभाविकपणे तुम्ही त्या शेजाऱ्याला मदत कराल. एक देश म्हणून आम्ही हेच करतो” असं जयशंकर म्हणाले. “जेव्हा तुमचा शेजारी कोण याकडे तुम्ही पाहता, त्यावेळी जिथे चांगला शेजारी असल्याची भावना असते तिथे भारत गुंतवणूक करतो. भारत मदत करतो. पण आम्ही काय केलं पाहिजे हे कोणी आम्हाला सांगू नये” असं परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले.
“आम्ही भेटी दरम्यान कोविडबद्दल बोललो. आमच्या बहुतांश शेजाऱ्यांना लसीची पहिली खेप भारताकडून मिळाली होती. काही शेजारी तणावाखाली होते. यात एक श्रीलंका आहे. वास्तवात त्यावेळी $4 बिलियन पॅकेजची मदत केली होती. त्यावेळी IMF सोबत त्यांचं बोलण खूप धीम्या गतीने सुरु होतं” असं परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले.
जे काही करावं लागेल ते आम्ही करु
“तुमचे शेजारी वाईट सुद्धा असू शकतात. दुर्देवाने आमचे तसे शेजारी आहेत. जेव्हा तुमचे शेजारी वाईट असतात. जर कोणी जाणुनबुजून, सतत आणि कुठल्याही चिथावणीशिवाय दहशतवाद सुरु ठेवत असतील, तर आम्हाला दहशतवादाविरुद्ध आमच्या लोकांचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आम्ही तो अधिकार वापरणार. आम्ही त्या अधिकाराचा कसा वापर करतो, ते आमच्यावर आहे. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करु” असं जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं.
बांग्लादेशात काय संदेश घेऊन गेलेले?
“भारताचा विकास ही एक वाढत जाणारी लाट आहे, याची आमच्या बहुतांश शेजाऱ्यांना जाणीव आहे. भारताने प्रगती केली, तर आमच्यासोबत शेजारी देश सुद्धा प्रगती करणार. मी हाच संदेश घेऊन बांग्लादेशात गेलो होतो. तिथे आता निवडणुका आहेत. आम्ही त्यांना त्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर तिथे शेजारपणाची भावना वाढेल अशी अपेक्षा आहे” असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले.
