उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका, थेट नेतृत्त्वावरच आक्षेप; धक्कादायक युक्तिवादाने सर्वच आवाक
शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट आक्षेप घेतला आहे. नीरज कौल यांनी ठाकरे यांचे नेतृत्व कुचकामी ठरवत, त्यांनी पक्ष वैयक्तिक व्यवस्थेसारखा वापरल्याचा युक्तिवाद केला. बाळासाहेबांनंतर पक्षप्रमुख पद आले, मात्र ठाकरेंनी पक्षाला लोकशाहीऐवजी एकाधिकारशाहीने चालवल्याचे म्हटले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. युक्तिवादाच्या तिसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी आज थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच आक्षेप घेतला. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व कूचकामी असल्याचं नीरज कौल यांनी कोर्टाला सांगितलं. कौल यांच्या या युक्तिवादामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर नीरज कौल यांनी हा मोठा युक्तिवाद केला आहे.
नीरज किशन कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदावर अधिक फोकस ठेवला. 2013मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आले होते. बाळासाहेबांचा सन्मान म्हणून हे पद गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षप्रमुख पद निर्माण झालं होतं. बाळासाहेबानंतर पक्षाला चांगल्या उत्तरदायित्वाची अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरेंकडून ती पूर्ण झाली नाही. ठाकरे यांनी पक्षाला वैयक्तिक व्यवस्थेप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.
वाद शिंदेंच्या नियुक्तीचा नाहीच
सध्याचा वाद हा शिंदेंच्या नियुक्तीचा नाही, तर कोणती बाजू मूळ पक्ष आहे याचा आहे. शिंदेंनी आमदार म्हणून, मंत्री म्हणून जे काम केलं ते लोकप्रतिनिधी म्हणून केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं कौल म्हणाले.
ही तर एकाधिकारशाही
सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षात काय असावे? संघटना कशी चालावी? यावर बोलण्याचा अधिकार आहे. संघटनेत 2-3 पेक्षा अधिक लोक नियुक्त केली जात असेल तर पक्षात लोकशाही कुठे आहे? ही तर एकाधिकारशाही झाली ना? निवडणूक आयोग ही एक महत्वाची संस्था आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देताना लावलेली टेस्ट योग्य आहे, असं कौल यांनी स्पष्ट केलं.
काल काय घडलं?
नीरज कौल यांनी कालही जोरदार युक्तिवाद केला होता. कालही त्यांनी बाळासाहेबांच्या सन्मानासाठी शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आल्याचं सांगितलं होतं. तसेच विधिमंडळ पक्षात फूट असली तरी प्रत्यक्षात ती राजकीय पक्षातच फूट होती, असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज कौल यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच आक्षेप घेणारा युक्तिवाद केल्याने सर्वच आवाक झाले आहेत.
