जयपूरमध्ये संघाच्या तीन दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात, काय निर्णय होणार? देशाचं लक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आज जबलपूरच्या कचनार सिटी येथे सुरू झाली. बैठकीचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह माननीय दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

जबलपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आज, 30 ऑक्टोबर रोजी जबलपूरच्या कचनार सिटी येथे सुरू झाली. बैठकीचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह माननीय दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून केले. या बैठकीस संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, मुकुंदा, अरुणकुमार, रामदत्त चक्रधर, आलोककुमार आणि अतुल लिमये यांच्यासह अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य, देशातील सर्व 11 क्षेत्रे आणि 46 प्रांतांचे संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि निमंत्रित कार्यकर्ते अशा एकूण 407 कार्यकर्त्यांची उपस्थिती दर्शवली.
बैठकीच्या सुरूवातीला समाजजीवनातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यात राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला ताई मेढे, वरिष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, दिल्लीचे ज्येष्ठ नेते विजय मल्होत्रा, वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री कस्तुरीरंगन, माजी राज्यपाल एल. गणेशन, गीतकार पियूष पांडे, चित्रपट अभिनेते सतीश शाह, पंकज धीर, हास्य अभिनेते असरानी, आसामचे प्रसिद्ध संगीतकार जुबिन गर्ग यांच्यासह पहलगाम येथे हल्ल्यात मरण पावलेले हिंदू पर्यटक, एअर इंडिया दुर्घटनेतील बळी तसेच हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पंजाब आणि देशातील इतर भागांतील नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली.
देशातील विविध भागांतील नैसर्गिक आपत्तींच्या वेळी समाजाच्या सहकार्याने स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्यांची माहितीही देण्यात आली. बैठकीत श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त, बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ या गीताच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त विशेष निवेदने जारी केली जाणार असून, त्या संदर्भातील कार्यक्रमांवरही चर्चा होईल.
तसेच संघाच्या शताब्दी वर्षात होणाऱ्या गृह संपर्क अभियान, हिंदू सम्मेलन, सद्भाव बैठक आणि प्रमुख जनसंगोष्ठीच्या तयारीवरही विचारविनिमय होईल. विजयादशमी उत्सवांची समीक्षा तसेच वर्तमान परिस्थितीवरही चर्चा होणार आहे.
