मोठ्या मनाचा डॉक्टर… एअर इंडिया दुर्घटनेत दगावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिले 6 कोटी, जखमींसाठीही हात पुढे
एअर इंडियाच्या फ्लाइट 171च्या भीषण अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजला 6 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यूएईचे डॉ. शमशीर वायलिल यांनी ही मदत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना दिली. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 25 लाख तर जखमींना 3.5 लाख रुपये मदत मिळाली.

एअर इंडियाची फ्लाईट 171च्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा बीजे मेडिकल कॉलेज सुरू झालं. पण नेहमीपेक्षा कॉलेजचं वातावरण नव्हतं. सर्व शोकाकूल होते. सर्वांना धक्का बसलेला होता. आपले साथी आपल्यासोबत नसल्याची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण या दु:खातही एक भावूक क्षण पाहायला मिळाला. या भयंकर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना पहिल्यांदा आर्थिक मदत मिळाली. एकूण 6 कोटी रुपयांची आर्थिक मदत या लोकांना मिळाली.
यूएईचे हेल्थकेअर उद्योजक आणि परोपकारी डॉ. शमशीर वायलिल यांनी ही आर्थिक मदत दिली आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर काही दिवसानेच वायलिल यांनी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वचन पाळलंही. अबू धाबीतून व्हिपीएस हेल्थकेअरचे प्रतिनिधी हा मदतनिधी घेऊन अहमदाबादला आला. त्यांनी बीजे मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. मिनाक्षी पारिख यांच्या कार्यालयात एका खासगी समारंभात मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. कॉलेजचे डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी या दुर्घटनेत दगावले. त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश एस जोशी आणि ज्युनिअर डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने आणि दु:खाची जाणीव ठेवून पार पाडला.
संमिश्र भावनांचा दिवस
विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना या मदतनिधीचा पहिला भाग देण्यात आला. या चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)चा एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असलेला आर्यन राजपूत, श्रीगंगानगर (राजस्थान)चा मनव भाडू, बाडमेर (राजस्थान)चा जयप्रकाश चौधरी आणि भावनगर (गुजरात)चा राकेश गोबरभाई दियोरा यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. या चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम दिली गेली.

Medical Students
त्याला चाइल्ड सर्जन व्हायचं होतं
हे चारही विद्यार्थी त्यांच्या मेडिकल करिअरची सुरुवात करत होते. त्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्यांचं आयुष्य अत्यंत दुर्देवीपणे संपुष्टात आलं. यावेळी राकेश दियोरा याचा मोठा भाऊ विपूल भाई गोबरभाई दियोरा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो आमच्या संपूर्ण कुटुंबाचा आशेचा किरण होता. मेडिकल कॉलेजात प्रवेश घेणारा तो आमच्या कुटुंबातील पहिला तरुण होता. आम्ही शेतकरी आहोत. त्याला मुलांशी खास प्रेम होतं. त्यामुळेच त्याला चाइल्ड हार्ट सर्जन व्हायचं होतं. पण हा धक्का आमच्या सारखा झटक्या सारखा आहे. आमच्या घरात चार बहिणी आहेत. वडिलांची तब्येत ठिक नसते. त्यामुळे सर्वांची तोच आशा होता. पण ही मदत आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. असं विपूल भाई म्हणाले.
या विद्यार्थ्यांशिवाय सहा मृतकांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत देण्यात आली. यात न्यूरोसर्जरी रेजिडेंट डॉ. प्रदीप सोलंकी (या दुर्घटनेत सोलंकी यांची पत्नी आणि मेव्हणा दगावला), सर्जिकल ऑन्कोलॉजी रेजिडेंट डॉ. नीलकंठ सुथार ( यांच्या कुटुंबातील तिघे दगावले) आणि बीपीटी विद्यार्थी डॉ. योगेश हदत (यांच्या भावाचा मृत्यू झाला) आदींचा समावेश आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. प्रत्येक मृतकामागे 25 लाखाची मदत करण्यता आली.

Medical Students
जखमींनाही हात
ज्युनिअर डॉक्टर्स असोसिएशनने डीनशी चर्चा करून 14 गंभीर लोकांची यादी तयार केली आहे. या 14 ही लोकांना आर्थिक मदत दिली गेली आहे. विमान दुर्घटनेत जळाल्यामुळे, अंतर्गत जखमांमुळे आणि गंभीर स्थितीत पाच दिवस रुग्णालयात दाखल असलेले हे लोक आहेत. या सर्वांना प्रत्येकी 3.5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
यात डोकं, मान आणि शरीराला इतरत्र जखमा जालेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील एमबीबीएसचे विद्यार्थी, गंभीररित्या भाजलेले डॉ. केल्विन गमेती आणि डॉ. प्रथम कोलचा सारख्या रेजिडेंट्स डॉक्टर तसेच कॉलेजच्या सदस्यांचे नातेवाईक मनिषा बेन आणि त्यांच्या आठ महिन्याच्या मुलाचा यात समावेश आहे. यांच्यावर अजूनही उपचार पूर्ण व्हायचा आहे.
काही दिवसातच संकल्प पूर्ण
डॉ. शमशीर वायलिल यांनी 17 जून रोजी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी 6 कोटी रूपये देऊन आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे. डॉ. शमशीर यांनी दुर्घटनेच्या काही दिवसानंतर हे आश्वासन दिलं होतं. अतुल्यम हॉस्टेलची वाताहात झाल्याचं समोर आल्यावर त्यांनी ही घोषणा केली होती.
त्यावेळी डॉ. शमशीर यांनी एक पत्र लिहिलं होतं. तुमच्या प्रिय व्यक्तींचे जे स्वप्न होतं, जे लोक आरोग्य सेवेला जीवन मानतात त्या प्रत्येकाचे तेच स्वप्न होतं. त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात ठेवा. संपूर्ण आरोग्य समुदाय तुमच्यासोबत आहे, असं शमशीर यांनी या पत्रात म्हटलं होतं.
आर्थिक मदत वितरण केल्यावर मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी आणि स्टाफने मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहिली. अनेक लोकांना तर या दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच हॉस्टेलला यायचं होतं.
यावेळी कॉलेजच्या डीन डॉ. मीनाक्षी पारीख यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सर्वजण ही अत्यंत धक्कादायक घटना स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहोत. अशावेळी एकजूट होण्याचा हा छोटा प्रयत्नही खूप महत्त्वाचा असतो. आरोग्य विभाग या दु:खाच्या प्रसंगात एकत्र आला आहे, असं पारीख म्हणाल्या. तर, आम्ही आमच्या मित्रांना गमावलंय, याचं खरं दु:खं आहे. डॉ. शमशीर यांनी जे केले त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आमची परिस्थिती समजून घेणारा व्यक्ती आहे, याची जाणीव झाली. ते वेळेला धावून आले हे खूप महत्त्वाचं आहे, असं ज्युनिअर डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. शेखर पारघी यांनी सांगितलं.
