मोठी बातमी! दगडफेक अन् जाळपोळ, महाराष्ट्राच्या या शेजारील राज्यात तणाव वाढला
Violence : उज्जैनमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संध्याकाळी शहरात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यानंतकर आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा परिस्थिती चिघळली आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य मध्य प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उज्जैनमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संध्याकाळी शहरात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यानंतकर आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा परिस्थिती चिघळली आहे. दगडफेक आणि जाळपोळीद्वारे पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू केला.
उज्जैनमध्ये तणावाची परिस्थिती
समोर आलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील राम मंदिराजवळील सुखला गली येथे काही लोकांनी हिंदुत्ववादी नेते सोहेल ठाकूर यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे तराणा तहसीलमध्ये तणाव निर्माण झाला. समाजात अशांतता वाढल्यामुळे संध्याकाळी काही लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 163 लागू केले.
गुरूवारी घडलेयल्या या घटनेनंतर शुक्रवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि हनुमान चालीसा पठण केले. यावेळी बजरंग दलाकडून फरार आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्याचे घर पाडण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना समजावून शांत केले. त्याचबरोबर स्थानिक आमदार महेश परमार यांनीही पोलिस ठाण्यात पोहोचून पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
दुपारी पुन्हा गोंधळ
आज दुपारी परिस्थिती पुन्हा बिघडली होती. काल संध्याकाळी तोडफोड झालेल्या बस स्टँडजवळ अज्ञात व्यक्तींनी आज एका बसला आग लावली. तसेच नई बखल तकिया कलीम परिसरात दगडफेक करण्यात आली. यात एका मोटारसायकलचे नुकसान झाले असून काही घरांच्या खिडक्या तुटल्या आहेत. काही महिलांनी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
आरोपी अचानक आले दगडफेक केली आणि पळून गेले
या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितले की, 25-30 जणांचा जमाव अचानक परिसरात घुसला, त्यांनी तोडफोड केली आणि ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता पोलिस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फराप असून त्याची ओळख पटलेली नाही.
