धक्कादायक! स्तनपान करणाऱ्या आईच्या दूधात आढळलं युरेनियम; 6 जिल्ह्यांमध्ये 40 प्रकरणं, नवजात बालकांना कॅन्सरचा धोका
बाळाच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आईचं दूध आवश्यक असतं. एखादी गंभीर समस्या उद्भवली तरी वैद्यकीय सल्ल्यानेच आईचं स्तनपान थांबवावं. जर युरेनियमचं प्रमाण जास्त आढळलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉर्म्युला फीडिंगची शिफारस केली जाऊ शकते.

‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, 40 स्तनपान करणाऱ्या आईंच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये युरेनियमचं प्रमाण अत्यंत उच्च असल्याचं आढळून आलंय. पाटणा इथल्या महावीर कर्करोग संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांनी हा अभ्यास केला आहे. नवी दिल्लीतील एम्स इथल्या बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकासह ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात भोजपूर, बेगुसराय, समस्तीपूर, खगरिया, कटिहार आणि नालंदा इथल्या 17 ते 35 वर्षे वयोगटातील 40 महिलांच्या आईच्या दुधाच्या नमुन्यांचं विश्लेषण केलं गेलं. या सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम (U-238) आढळून आलं. याचं प्रमाण 0 ते 5.25 ग्रॅम प्रतिलिटरपर्यंत होतं. भूजलात हाच घटक फार पूर्वीपासून आढळतोय. परंतु आता चिंताजनक गोष्ट अशी आहे की ते आता थेट नवजात बालकांपर्यंत स्तनपानातून पोहोचत आहे.
दुधातील युरेनियमची पातळी खगरियामध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक, नालंदामध्ये सर्वांत कमी आणि कटिहारमध्ये सर्वाधिक होती. दुधातील या युरेनियमचा स्रोत अद्याप स्पष्ट झाला नसल्याचं एम्सचे सहलेखक डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितलं. “हे युरेनियम कुठून येतं हे आम्हाला अद्याप माहीत नाही. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणदेखील याची चौकशी करत आहे. दुर्दैवाने युरेनियममुळे कर्करोग, न्युरोलॉजिकल समस्या आणि मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होतो, जो खूप चिंतेचा विषय आहे.”
बाळाचा सर्वांगीण विकास हा आईच्या दुधावर अवलंबून असतो. हेच दूध त्यांना विविध संसर्गांपासून वाचवतं आणि त्यांना निरोगी, तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतं. परंतु आईच्या दुधातच हानिकारक युरेनियम असल्याचं दर्शविणाऱ्या अभ्यासांनी निश्चितच चिंता निर्माण केली आहे. बिहारच्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी भूजलावर प्रचंड प्रमाणात अवलंबून राहणं, प्रक्रिया न केलेल्या औद्योगिक कचऱ्याचा विसर्ग, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा दीर्घकालीन वापर यांमुळे जैविक नमुन्यांमध्ये शिसं, पारा यांसारख्या धातूंचं प्रमाण वाढलं आहे. युरेनियम हा माती आणि पाण्यात आढळणारा एक अतिशय जड धातू आहे. हा घटक भूजलाद्वारे किंवा त्या पाण्याने सिंचित केलेल्या भाज्यांद्वारे आईच्या शरीरात पोहोचतो. डॉक्टरांच्या मते युरेनियम आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक आहे. युरेनियम मूत्रपिंडाचं नुकसान आणि न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करू शकतं. यामुळे भविष्यात कर्करोगाचादेखील धोक वाढू शकतो.
