असं एक गाव जिथे कोणाचाच मृत्यू होत नाही, तुम्ही ठरवलं तरी देखील मरू शकत नाही, 70 वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं?
कल्पना करा असं कधी कोणतं गाव असू शकतं का जिथे कधीच कोणाचा मृत्यू होत नाही? पण असंही जगाच्या पाठीवर एक गाव आहे, जिथे कधीच कोणाचा मृत्यू होत नाही. त्यामागे सत्तर वर्षांपूर्वी घडलेली एक कथा आहे.

तुम्ही कल्पना करू शकता का? जगात असं देखील एक ठिकाण आहे, जिथे तुम्ही मरू शकत नाहीत. हे गाव नॉर्वेमधील स्पिट्सबर्गेन द्विपसमूहामध्ये आहे. लॉन्गईयरब्येन (Longyearbyen) असं या गावाचं नाव आहे. या गावामध्ये एक विचित्र नियम लागू करण्यात आला आहे, या नियमामुळे हे गाव जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. सत्तर वर्षांपूर्वी हा कायदा या गावसाठी लागू करण्यात आला आहे, हा कायदा अस्तित्वात आल्यापासून या गावात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाहीये.लॉन्गईयरब्येन शहराची लोकसंख्या जवळपास 2,400 च्या आसपास आहे. या गावातील वातावरण हे खूपच आव्हानात्मक आहे, त्यामुळेच या गावात हा कायदा करण्यात आला आहे.
हे गाव उत्तर ध्रुवाजवळ आहे. त्यामुळे या गावात वर्षभर कडाक्याची थंडी असते, गावात वर्षभर तापमान अंदाजे -20 डिग्रीच्या आसपास असतं. गावात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळेच सत्तर वर्षांपूर्वी हा विचित्र नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार गावात कोणाचाही मृत्यू होऊ दिला जात नाही, जर कोणी गंभीर आजारी असेल, त्याचा काही दिवसांमध्येच मृत्यू होईल असा अंदाज आला तर त्या व्यक्तीला तातडीनं नॉर्वेमधील इतर शहरांमध्ये हलवलं जातं, जिथे तापमान सामान्य असेल अशा ठिकाणी अशा व्यक्तींना हलवलं जातं, तिथेच त्याचा मृत्यू होतो. त्याला परत गावात आणलं जात नाही.
नेमकं कारण काय?
या प्रथेमागे कोणतीही अंधश्रद्धा किंवा प्रथा नाहीये तर वैज्ञानिक कारण आहे, या गावात एवढी कडाक्याची थंडी असते की गावाचं तापमान हे मायनस वीस डिग्री सेल्सिअस असतं. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचा दफनविधी या गावात करण्यात आला तर थंडीमुळे कधीच या मृतदेहाचं विघटन होत नाही कबरीमध्ये तो जसाच्या तसा राहातो, तसेच या मृतदेहावर शास्त्रज्ञांना विशिष्ट प्रकारचे जीवाणू आढळून आले, जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक होते, त्यामुळे सत्तर वर्षांपूर्वी येथील स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे. जर एखादा व्यक्ती गंभीर आजारी असेल तर त्याला या गावातून दुसरीकडे जिथे सामान्य तापमान असेल तिथे हलवले जाते, तसेच त्याच्या मृत्यूनंतर तिथेच त्याचा अंत्यविधी देखील करण्यात येतो. एवढंच नाही तर या गावात कोणाचा जन्म देखील होत नाही.
