
पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. मुंबईवरील 26/11 हल्ला, पठाणकोट, उरी या ठिकणी हल्ले, असे एक ना अनेक हल्ले पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होत राहीले. अनेकदा भारताने पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिलं पण त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. पण 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने या दुष्कृत्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल हे स्पष्ट केलं. भारताने 15 दिवसानंतर सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. असं असताना दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा निष्फळ प्रयत्न सुरु केले. भारताने प्रत्येक हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू जोरकसपणे मांडली. आमची कारवाई फक्त आणि फक्त दहशतवाद्यांविरोधात आहे हे वारंवार स्पष्ट केलं. पण पाकिस्तानने जर हल्ले केले तर जसाच तसं उत्तर देऊ हे देखील सांगितलं. पाकिस्तानने केलेले प्रत्येक हल्ले परतवून लावले तसेच त्यांच्या सैन्यदलाची ताकद असलेली ठिकाणं उद्ध्वस्त केली. भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर 10 मे रोजी सीजफायर म्हणजेच युद्धविरामाची भीक मागितली. भारताने ही मागणी मान्य करत सीजफायरची घोषणा केली आहे. म्हणजेच आजपासून दोन्ही बाजूने कोणताही संघर्ष होणार नाही.
पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनी एक्सवर पोस्ट टाकत लिहिलं की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पण भारतावर हल्ला करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांनी माफी मागितली नाही. दुसरीकडे, पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, असा कांगावा केला.
युद्धविराम म्हणजेच सीजफायर अंतर्गत दोन्ही बाजूने शांतता बहाल केली जाते. सीजफायर हे एका बाजूने किंवा संघर्ष असलेल्या दोन्ही बाजूने घोषित केला जाऊ शकतो. कधी कधी सीजफायरचा कालावधी हा कमी असतो. कधी कधी दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असू शकतो. सीजफायर म्हणजे एक सैन्य करार असतो. याचा प्राथमिक उद्देश संपूर्ण युद्धक्षेत्रात शत्रुत्व थांबवणं हा असतो. विशिष्ट कालावधीसाठी शांतता प्रस्थापित केली जाते. सीजफायरमुळे दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यास मदत होते.
सीजफायरमुळे दोन्ही देशात चर्चेची दारं खुली होतात. यामुळे युद्धजन्य स्थिती थांबवण्यासाठी पुढच्या चर्चा करण्यात मदत होते. तसेच काही प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढले जातात. युद्धविरामामुळे दोन्ही देशांचं होणारं मोठं नुकसान टाळलं जातं. तसेच कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी वातावरण निर्मिती होते. दुसरं, सीजफायरदरमन्यान जखमी आणि आजारी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत होते. तसेच युद्ध होत असलेल्या ठिकाणी देवाणघेवाण आणि वाहतुकीसाठी मदत होते. असं असलं तरी सीजफायर हा पूर्णपणे युद्धाचा शेवट नसतो. कधी कधी सीमेपलीकडून सीजफायरचं उल्लंघनही केलं जातं. पाकिस्तानने अनेकदा सीजफायरं उल्लंघन केल्याचा भूतकाळ आहे.