कराची बेकरी नावावरून गोंधळाची स्थिती! युद्धजन्य स्थितीत दुकान व्यवस्थापनाने उचललं असं पाऊल
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी 15 शहरांवर हल्ल्याची योजना आखली होती. मात्र हा प्रयत्न भारताने निष्फळ केला. त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही. अशा स्थितीत कराची बेकरीवर तिरंगा झेंडे लावण्याचं काम सुरु आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधीही युद्ध होऊ शकतं अशी स्थिती आहे. कारण पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी देण्याचं धोरणं कायम ठेवलं आहे. तसेच भारताने केलेल्या कारवाईनंतर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणावपूर्ण स्थिती आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतील 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण सैन्य दलाने प्रत्येक हल्ला परतवून लावला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या लाहोरमध्ये स्फोट होत आहेत. तर इस्लामाबादपासून कराचीपर्यंत विमानतळं बंद आहेत. असं असताना कराची बेकरीवर तिरंगा झेंडे लावले जात आहेत. असं करण्याचं कारण काय? सविस्तर जाणून घ्या. भारतातील हैदराबादमध्ये कराची बेकरी नावाने एक फेमस कुकीज ब्रँड आहे. या बेकरीतील ओस्मानिया बिस्किट देशभरात ओळखलं जातं. हैदराबाद शहरात एक कॅफे म्हणून या ब्रँडचा नावलौकिक आहे. पण जेव्हा कधी भारत पाकिस्तान तणाव वाढतो तेव्हा कराची बेकरी व्यवस्थापक शहरातील 20 ब्रँचवर तिरंगा लावण्याचं काम सुरु करतात.
या ब्रँडचं नाव कराचीशी निगडीत असल्याने कायम टेन्शन वाढतं. कारण हे नाव पाकिस्तानातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. जेव्हा दोन्ही देशात तणाव वाढतो तेव्हा लोकं तसं समजून या स्टोअरवर हल्ला चढवतात. यासाठी खबरदारी म्हणून ब्रँड त्यांच्या दुकानाबाहेर तिरंगा झेंडे लावते. हा भारतीय ब्रँड असल्याचं या माध्यमातून सांगितलं जातं. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, ‘कराची बेकरी’च्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांना उच्च अधिकाऱ्यांनी काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी कराची बेकरी स्टोअरभोवती आपले कर्मचारी तैनात करण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील.

कराची बेकरी
कराची बेकरी 1953 मध्ये खानचंद रामनानी नावाच्या एका सिंधी हिंदू कुटुंबाने सुरु केली होती. भारत पाकिस्तान फाळणीमुळे अनेक कुटुंब कराचीतून भारतात आले. त्यात हे कुटुंब हैदराबादला आलं. त्यामुळे त्यांनी बेरकीच्या पुढे कराची जोडलं. हैदराबादमधील पहिली कराची बेकरी मोअज्जम जही मार्केटमध्ये उघडण्यात आली.’कराची बेकरी’ त्याच्या ‘ओस्मानिया बिस्किट’साठी सर्वात प्रसिद्ध आहे. कंपनी 20 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. कंपनी दररोज 10 टनांपेक्षा जास्त बिस्किटे तयार करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कराची बेकरी’चे वार्षिक उत्पन्न 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कंपनी एक हजाराहून अधिक लोकांना रोजगार देते.