स्मोकिंगला बंदी, तरी का असतो विमानाच्या टॉयलेटमध्ये एशट्रे? जाणून घ्या कारण
विमानात स्मोकिंगवर बंदी असली तरी टॉयलेटमध्ये अजूनही एशट्रे का ठेवले जातात? जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर यामागची खरी कारणं जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

जर तुम्ही कधी विमानप्रवास केला असेल, तर तुम्हाला विमानाच्या टॉयलेटमध्ये एक गोष्ट नक्कीच दिसली असेल ते म्हणजे ‘एशट्रे’ (Ashtray). आता तुम्ही म्हणाल, जेव्हा विमानात सिगारेट ओढणं पूर्णतः बंदी आहे, तर मग हे एशट्रे का ठेवले जातात? हा प्रश्न अनेक प्रवाशांच्या मनात येतो. पण यामागचं कारण फक्त आश्चर्यचकित करणारं नाही, तर विमानातील सुरक्षा नियमांशीही थेट संबंधित आहे.
काय आहेत नियम ?
१९८० च्या दशकात जगभरातील बहुतेक एअरलाइन कंपन्यांनी विमानात सिगारेट ओढण्यावर बंदी घातली. २००० नंतर तर ही बंदी सर्व विमानांमध्ये लागू झाली. कारण, विमानात जर कसलाही धूर झाला तर तो फारच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सिगारेट ओढणं हा गुन्हा मानला जातो आणि यासाठी कडक शिक्षा होऊ शकते.
मग टॉयलेटमध्ये एशट्रे का?
इतकी कडक बंदी असतानाही, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये एशट्रे ठेवलेले का असतात? याचं उत्तर आहे – ‘सेफ्टी बॅकअप’! आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा नियमांनुसार, प्रत्येक कमर्शियल फ्लाइटमध्ये, विशेषतः टॉयलेटमध्ये, एशट्रे असणं अनिवार्य आहे. कारण, काही वेळा एखादा प्रवासी नियम झुगारून सिगारेट ओढतोच. अशावेळी, जर त्याच्याकडे सिगारेट विझवण्यासाठी योग्य व्यवस्था नसेल, तर तो ती सिगारेट कचऱ्याच्या डब्यात टाकू शकतो.
कचऱ्याच्या डब्यांमधील धोका
टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यांमध्ये टिशू पेपर, कापसाचे बोळे, पॉलिथिन इ. ज्वलनशील वस्तू असतात. जर सिगारेट विझवल्याशिवाय तिथे टाकली गेली, तर तेथे आग लागण्याची शक्यता अत्यंत वाढते. आणि जर फ्लाइटमध्ये आग लागली, तर ती आपत्कालीन परिस्थिती बनू शकते. म्हणूनच एशट्रे टॉयलेटमध्ये ठेवण्यात येतात जेणेकरून नियम तोडणारा प्रवासी कमीत कमी सिगारेट सुरक्षितपणे विझवू शकेल.
एशट्रेचा अर्थ असा नाही की तिथे सिगारेट ओढण्याची परवानगी आहे. उलट, ते विमानात स्मोकिंग करणाऱ्यांपासून इतर प्रवाशांचं रक्षण करण्यासाठीच असतं. ही व्यवस्था ‘जर काही उलटं झालं, तर त्यासाठीची तयारी’ म्हणून ठेवली जाते. विमान कंपन्या मान्य करतात की, काही प्रवासी नियम पाळत नाहीत, पण तरीही विमानातल्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शक्यता लक्षात घेतली जाते.
जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही विमानाच्या टॉयलेटमध्ये एशट्रे पाहाल, तेव्हा ते सजावटीसाठी नाही तर सुरक्षा कारणासाठी आहे, हे लक्षात ठेवा. हे ‘स्मोकिंगची परवानगी’ नसून ‘आपत्ती टाळण्याचं’ एक साधन आहे.
