पावसाचा तांडव तर पाहिला, आता हिवाळ्यात थंडीचा असा कडाका की…काय आहे ती भविष्यवाणी
Winter Weather Forecast : भारतातील अनेक राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात ही पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. त्यातच आता हिवाळ्याविषयी मोठं भाकीत समोर येत आहे. पावसाने कहर केल्यानंतर आता थंडीचा सामना करावा लागणार आहे.

मध्यंतरी रेंगाळलेल्या पावसाने देशात कहर घातला आहे. उत्तराखंडापासून तर पार दक्षिणेपर्यंत पावसाने मुलूखगिरी केली. चौथाई, देशमुखी सर्व काही वसूल केले. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रशांत महासागरात अल नीनो ऐवजी ला नीना हे सक्रिय झाल्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. त्यामुळे यंदा पाऊस देशावर मेहरबान झाला. तर दुसरीकडे या ला नीनाचा प्रभाव असाच कायम राहणार असून देशात थंडीचा कडाका जाणवणार असल्याचे समोर येत आहे. काय आहे ते भाकीत?
अमेरिकेची राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय संस्था (National Oceanic and Atmospheric Administration – NOAA) हिने भाकीत वर्तवले आहे. त्यानुसार, ला-नीनाच्या प्रभावामुळे भारतात यंदा थंडीचा कडाका जाणवणार आहे. इंडोनेशियापासून ते अमेरिकेपर्यंत वातावरणीय बदलाचा अनुभव माणसाला येईल. भारतीय उपखंडात त्याचा खास परिणाम दिसून येईल.
पुढील महिन्यापासून, सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान ला नीना अधिक सक्रीय असेल. त्याची शक्यता 53 टक्क्यांपर्यंत आहे. तर वर्षाच्या अखेरीस हे प्रमाण 58 टक्क्यांवर जाईल. एकदा हे पॅटर्न लागू झाले तर ते संपूर्ण हिवाळा जाणवेल. ला नीना ही एक नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. यामध्ये विषुवृत्तीय प्रशांत महासागराचे पाणी अधिक थंड होईल. त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होईल. तर दुसरीकडे एल नीनो असेल तर समुद्रातील पाणी थोडे उबदार, कोमट असते. उत्तरी गोलार्धात त्याचा परिणाम दिसेल. जर ला नीना कमकुवत झाले तर मात्र थंडीचा कडाका जाणवणार नाही.
ला-नीना म्हणजे तापमानात घट
ला-नीना हे एक हवामानातील पद्धत आहे. या प्रक्रियेत प्रशांत महासागरातील पाणी अपेक्षेपेक्षा अधिक थंड होते. त्याचा परिणाम जगभरातील वातावरणावर होतो. त्यामुळे भारतात मुसळधार पाऊस पडतो आणि आफ्रिकासह दक्षिण अमेरिकेतील काही भागात कोरडा दुष्काळ येतो. हा पॅटर्न जागतिक तापमान कमी करण्यास मोठा हातभार लावतो. तर त्याच्या उलट अल नीनो पॅटर्न असतो. त्यामुळे भारतासह अनेक देशात तापमान वाढते. सध्या ला नीना सक्रीय झाल्याने भारतीय उपखंडात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
