आधी सिगारेट अन् नंतर दारू पाजली, भूत काढण्याच्या नावाखाली तरुणीसोबत भयंकर कांड, वाचा अंगावर काटा आणणारी घटना
Black Magic: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचा तिच्या जोडीदाराने आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी काळ्या जादूच्या नावाखाली तासन्तास शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

आजच्या आधुनिक युगातही देशात अंधश्रद्धा अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचा तिच्या जोडीदाराने आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी काळ्या जादूच्या नावाखाली तासन्तास शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेतील आरोपींनी असा दावा केला होता की, या तरूणीला भूत लागले आहे आणि ते शरीरातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यानंतर आरोपींनी महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. हा सर्व प्रकार काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेची घटना गेल्या आठवड्यात घडली. या घटनेतील आरोपी अखिल (26), त्याचे वडील दास (54) आणि एक तांत्रिक शिवदास (54) यांना अटक करण्यात आली आहे. अखिलच्या कुटुंबाने एका तांत्रिकाला त्यांच्या घरी बोलावले आणि तरूणीवर काळी जादू करण्याचा विधी सुरू केला. हा विधी सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि रात्री उशिरापर्यंत सुरू होता अशी माहिती पीडित तरूणीने दिली आहे.
या घटनेतील पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, विधी सुरु असताना तिला सिगारेट पिण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर तिला राखेत शेंदूर मिसळून खायला देण्यात आला आणि तिच्या शरीरावर उदबत्तीने चटके देण्यात आले. या छळामुळे तरूणीची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. यामुळे तरूणीच्या वडिलांना संशय आला. त्यांनी ताबडतोब पोलीसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मात्र तांत्रिकाला फोन करणारी तरुणाची आई अजूनही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या तपासाला सुरुवात
अंधश्रद्धेच्या घटनेनंतर तांत्रिक शिवदासने फोन बंद केला होता आणि तो लपून बसला होता. मात्र पोलीसांनी त्याला थिरुवल्लाच्या मुथूर परिसरातून अटक केली. त्यानंतर आता न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या आरोपींनी याआधी अशा प्रकारे कुणाला त्रास दिला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
