धक्कादायक! ज्योती मल्होत्राचं हाफिज सईद कनेक्शन उघड, ‘त्या’ 14 दिवसांत…
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात एकूण 14 दिवस राहिली होती. विशेष म्हणजे या काळात तिने हेरगिरीसाठी प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जात आहे. तशी कबुलीच तिने दिल्याचं बोललं जातंय.

Youtuber Jyoti Malhotra : यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं जाळं उघडं पडलं आहे. आतापर्यंत तपास संस्थांनी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्योती मल्होत्राची मात्र सध्या चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, याच ज्योतीबाबत अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिने हेरगिरीसाठी थेट मुरीदकेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मुरिदके इथं होती 14 दिवस
ज्योती मल्होत्राची आज एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स चौकशी करणार आहे. ज्योतीने लष्कर ए तैयबाचं अस्तित्त्व असलेल्या मुरिदके येथे जाऊन चक्क 14 दिवस हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं होतं. दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय मुरिदके इथं आहे. या ठिकाणी ज्योती मल्होत्रा एकूण 14 दिवस होती. या काळात तिने हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जातंय. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली आहे.
एकूण 12 हेर पकडले
भारतात एकूण तीन राज्यांत पाकिस्तानी हेरांचं जाळं पसरलेलं आहे. तीन राज्यांतून एकूण 11 दिवसांत भारताच्या तपास संस्थांनी एकूण 12 हेर पकडले आहेत. या सर्वच हेरगिरांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
हरियाणाच्या पोलिसांनी तिला घेतलं ताब्यात
पहलगामचा हल्ला झाला, त्याच्या तीन दिवसांआधी ज्योती मल्होत्रा ही काश्मिरात गेली होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय आणखीच बळावला होता. त्यानंतर हरियाणाच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. त्यामुळे आगामी काळात या हेरगिरीबाबत आणखी मोठीी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ज्योतीचे वडील नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, ज्योतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तिचे वडील हरिश मल्होत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतीने आम्हाला सांगायची की मी दिल्लीला चालले. पण ती नेमकी कुठे जायची हे आम्हाला माहिती नाही. तिने कधी तिच्या मैत्रिणींना घरी आणलं नाही. दोन दिवसांपूर्वी घरी पोलीस आले होते. पोलिसांनी ज्योतीचा लॅपटॉप तसेच इतर सामान नेले आहे. ज्योतीदेखील घरी आली होती. बॅगमध्ये काही कपडे घेऊन ती गेली. मला काहीही कल्पना नाही, असं ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं आहे.