विद्या चव्हाण यांच्या ‘डान्सिंग डॉल’ला अमृता फडणवीसांचं अब्रुनुकसानीच्या दाव्यानं उत्तर, नेमकं प्रकरण काय?

विद्या चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अमृता फडणीस यांनी चव्हाणांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर एक ट्वीट करुन एकेरी उल्लेखात त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

विद्या चव्हाण यांच्या 'डान्सिंग डॉल'ला अमृता फडणवीसांचं अब्रुनुकसानीच्या दाव्यानं उत्तर, नेमकं प्रकरण काय?
Amrita Fadnavis, Vidya Chavan

मुंबई : राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्यानं भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्याची चौकशीही करण्यात आलीय. तर या प्रकरणावरुनच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यात नवा वाद उभा राहिलाय.

विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख केला होता. हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

विद्या चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अमृता फडणीस यांनी चव्हाणांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर एक ट्वीट करुन एकेरी उल्लेखात त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट

आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी
स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,
ती आहे NCPची नेता ‘विद्याहीन’ चव्हाण…

आता कोर्टातच जाऊन साफ
करावी लागेल,तिने पसरविलेली
सगळी विषारी घाण!

विद्या चव्हाण, मानहानीची नोटीस वाच आणि सुधार
स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण!

डान्सिंग डॉल ही वाईट उपमा नाही – विद्या चव्हाण

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना उत्तर देताना त्यांच्या कौटुंबिक वादावर बोट ठेवलं आहे. त्यावर बोलताना आमच्या घरात फडणवीस ताईंना नाक खुपसण्याची गरज नाही. डान्सिंग डॉल ही काही वाईट उपमा नाही, मी डान्सिंग डाँल हे का म्हटलं. आपल्या मनात काही आकस नाही उलट माझ्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. त्या अंत्यत बुद्धिमान आहेत त्यांना काय बोलायंच आहे ते बोलुदेत, अशी खोचक प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय.

भाजपविरोधात राष्ट्रीय जनता दलही आक्रमक

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जितेन गजरिया यांनी माफी मागितल्याची माहिती आहे. जितेन गजरिया हे भाजपच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी आहेत. रश्मी ठाकरेंचा उल्लेख त्यांनी राबडीदेवी-रश्मी ठाकरे असा केला होता. दरम्यान, यावरुन लालूंची पार्टी राष्ट्रीय जनता दलानंही आक्षेप घेतलाय. महिलांविरोधात भाजपची मानसिकता दिसून येते, त्यामुळे ठाकरे सरकारनं गजरियावर कारवाई करावी, असं आवाहन राजदकडून करण्यात आलंय.

‘मुख्यमंत्रीपद तुमची घरची प्रॉपर्टी आहे का?’

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राबडीदेवी हे कुण्या राक्षसाचं नाव नाही असं म्हटलंय. ‘राबडी देवी हे कुणा राक्षसाचे नाव नाही ना? राबडी देवी ह्या लालू प्रसाद यांच्या पत्नी आहेत. राबडी देवी हे बिहारमध्ये होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे. मुख्यमंत्री पद ही तुमची घरची प्रॉपर्टी आहे का? असा खोचक सवाल करत आपण गजारीया यांना समज दिल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

मात्र, तूर्तास आजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरुन सुरु झालेला हा वाद माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत पोहोचला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या एका वाक्यानं मानहानीची एक नोटीस गेली आहे. गुन्हेही दाखल झाले आहेत, तिकडे बिहारमध्येही लालूंची राष्ट्रीय जनता दल आक्रमक झाली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश, वाद पेटणार?

Published On - 10:35 pm, Fri, 7 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI