BLOG: अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारायला हवी

BLOG: अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारायला हवी

रोजच्या आयुष्यात आपण पाहतो की, अपयशापेक्षा यशाला जास्त फुटेज मिळत असतं. पण त्यामुळे आपण अपयशी होण्याची प्रचंड शक्यता देखील दृष्टीआड (नजरंदाज) होते आणि केवळ यशस्वी लोकांचे भाषण, फोटो, कौतुक पाहून आपण मात्र मृगजळाला बळी पडतो.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 04, 2020 | 4:00 PM

देवेंद्र नावाचा एक विद्यार्थी होता. गावाकडं बी.ए. पास होऊन देवेंद्र पहिल्यांदाच पुण्यात आला होता. सदाशिव पेठेत संध्याकाळी फिरताना त्याला तरुणांचे जत्थेच्या जत्थे दिसले. कुणी हातात जाड-जड पुस्तकं घेऊन रीडिंग रुमला निघाले आहेत, कुणी चहा पिताना देखील पुस्तक वाचत आहे, कुणी पंचायतराज विषयी चर्चा करत आहेत. काही तरुण बाकड्यांवर बसून एकाग्रपणे गटचर्चा करत आहेत. (Survivorship Bias and art of thinking clearly)

रस्ता, फुटपाथ, टपऱ्या, बगीचे, मैदाने सगळीकडे उत्साहाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण-तरुणी दिसत होते. वेगवेगळ्या क्लासेसचे भव्य पोस्टर आणि त्यावरील स्पर्धा परीक्षेत यशस्वी तरुणांचे आत्मविश्वासू चेहेरे लक्ष वेधून घेत होते. पेपरवाले आणि पुस्तकांच्या दुकानात स्पर्धा परीक्षेच्या मासिक आणि पुस्तकांचाच भरणा दिसत होता. त्यातही “मन में है विश्वास”, “स्टीलफ्रेम”, “ताई मी कलेक्टर व्हयनु” अशी पुस्तकं दर्शनी भागात दिसत होती. गावाकडं जाऊन आता सामान घेऊनच पुण्याला यायचं आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं हे देवेंद्रनं मनाशी पक्क ठरवलं.

प्रत्येक वर्षी स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती येतात. त्यात 69 ते 300 पर्यंत रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केलेली असते. या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या तरुणांची संख्या 1 लाख ते 2 लाख अशी सांगितली जाते. प्रत्यक्षात नेमका आकडा काय आहे याबद्दल कुठेही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु उपलब्ध आकड्यांपैकी कुठलेही ग्राह्य मानले तरी परिस्थिती भयावह आहे हे स्पष्ट होतं. प्रत्येक वर्षी लाखो परीक्षार्थींपैकी मुठभर तरुण यशस्वी होतात, तर हजारो तरुणांच्या स्वप्नांचा गळा घोटला जातो.

वरील आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की देवेंद्रचं स्वप्न साकार होईल का याची शक्यता कदाचित शून्यापेक्षा थोडीशीच अधिक असेल. काही काळाने कदाचित त्याचीही स्वप्नं, स्पर्धा परीक्षा हरलेल्या हजारो तरुणांच्या स्वप्नांच्या स्मशानभूमीत सापडतील. मोजक्याच तरुणांच्या पूर्ण झालेल्या स्वप्नांच्या तुलनेत या स्मशानभूमीत हजारो पटींनी जास्त हरलेली स्वप्ने ‘गुमनाम’ होऊन ‘दफन’ आहेत. ही स्मशानभूमी डोळ्यांसमोर दिसत असूनही अदृश्य आहे. कारण हरलेल्या स्वप्नांचं कुणी पोस्टर लावत नाही, ना कुणी त्यावर पुस्तकं लिहितात, ना त्यावरील भाषणं युट्युबवर पसरवतात. क्लासेसचा बाजार, पुस्तक प्रकाशनं, वृत्तपत्रं, टीव्ही यांना सगळ्यांना मोजक्याच यशस्वी लोकांच्या कौतुकातून फुरसत कुठे आहे?

रोजच्या आयुष्यात आपण पाहतो की, अपयशापेक्षा यशाला जास्त फुटेज मिळत असतं. पण त्यामुळे आपण अपयशी होण्याची प्रचंड शक्यता देखील दृष्टीआड (नजरंदाज) होते आणि केवळ यशस्वी लोकांचे भाषण, फोटो, कौतुक पाहून आपण मात्र मृगजळाला बळी पडतो. इतर हजारो तरुणांप्रमाणे देवेंद्र देखील ‘Survivorship Bias’चा बळी आहे.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या प्रत्येक तरुणामागे हजारो अपयशी तरुण उभे आहेत. गाजलेल्या प्रत्येक लेखकामागे ज्यांना प्रकाशकही मिळत नाही असे हजारो लेखक छुपे आहेत. भारतीय टीममध्ये निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूमागे अजूनही स्ट्रगल करणारे हजारो खेळाडू आहेत. सिनेमामध्ये यश मिळवलेल्या प्रत्येक कलाकारामागे अजूनही ब्रेक न मिळालेले हजारो आशावादी कलाकार आहेत. आपण केवळ यशस्वी लोकांची नावे ऐकतो, त्यांच्याविषयी वाचतो आणि नकळत हे यश किती मुठभर लोकांच्या वाट्याला येतं व यश न मिळालेल्या लोकांची संख्या किती प्रचंड मोठी आहे याचा आपल्याला विसर पडतो.

यशस्वी लोकांच्या यश, इमेजच्या ऐकीव गोष्टी व आपल्या साध्या, खऱ्या, प्रामाणिक आयुष्यात आपण नकळत साम्य शोधून काढतो, त्यापासून प्रेरित होतो, अपयशी गर्दीपेक्षा आपण कसे वेगळे आहोत याचा विचार करतो व त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न सुरु करतो. पण हे कायम लक्षात घ्यायला हवं की त्या स्वप्नांच्या स्मशानभूमीतील दफन हजारो स्वप्ने अशीच साम्य शोधून, प्रेरित होऊन वाटचाल करत होती. त्यांचं वेगळेपण स्वत:लाच ठसवून सांगत होती. पण हाय रे दुर्दैव.. ती सारी स्वप्नं आज शांतपणे दफन आहेत!

आता दुसरं एक उदाहरण पाहू. दुसऱ्या महायुद्धात एकमेकांवर विमानाद्वारे हल्ले केले जायचे. विमानांवरही जमिनीवरून परतून हल्ले व्हायचे. विमानाची नक्की कोणती बाजू जास्त मजबूत करावी म्हणजे विमाने पडणार नाहीत यासाठी हिटलरविरोधी देशांमध्ये बराच अभ्यास केला जायचा. त्यापैकी एक प्रसिद्ध अभ्यासक म्हणजे अब्राहाम वाल्ड.

महायुद्धादरम्यान विमानं लढायला जायची. ही विमानं शत्रू राष्ट्राच्या सशस्त्र विमानं, जमिनीवरील बंदुकांपासून होणाऱ्या माऱ्यापासून सुरक्षित परत आली की तज्ज्ञ लोक परत आलेल्या विमानाच्या कोणत्या भागावर सर्वात जास्त गोळ्या लागल्या हे पाहायचे. त्यावरून त्यांनी असे निष्कर्ष मांडले की विमानाला अजून मजबूत करण्यासाठी त्याच्या पंख्याला आणि शेपटीला जास्त मजबूत करा. कारण गोळ्यांचा जास्त भडिमार तिकडे होतोय. ऐकायला सर्वांना बरोबर वाटलं. तेव्हाच अब्राहम वाल्ड म्हणाले, की याच्या उलटं करा. जिकडे गोळ्या सर्वात कमी लागत आहेत, त्या भागांना मजबूत करा! हा उपाय ऐकून सर्व चक्रावले.

अब्राहम वाल्ड यांंचं म्हणणं ऐकून सर्व चक्रावले होते, मात्र तरीही अब्राहम म्हणत होते तेच योग्य होतं. कारण ही सगळी मंडळी त्याच विमानांचा अभ्यास करत होती जी परत आली. जी जाऊन गोळ्या लागून पडली त्यांचा अभ्यास कसा करणार? याचा अर्थ, जर का गोळी विमानाच्या नाकाला किंवा शेपटीच्या वर लागत असतील, ते हमखास तिकडेच पडली. आणि ज्यांना पंख्याला किंवा शेपटीला लागली ती वापस आली म्हणजे की तिथे गोळ्या लागल्या की ते विमान पचवून घेऊन उडत परत येतात.

या जगप्रसिद्ध केस स्टडीमध्ये अब्राहाम वाल्डने “सर्व्हायव्हर बायस” काय असतो हे सांगितलं आहे. थोडक्यात आपले बरीच मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” अर्थात देवेंद्रप्रमाणे ते निष्कर्ष चुकतात.

थोडक्यात ‘Survivorship Bias’ म्हणजे आपल्या यशाची शक्यता आपल्याला उगाच वाढीव वाटणे. या धोक्यापासून बचाव करायचा असेल, तर कधीकाळी उत्तुंग झेप घेऊ पाहणाऱ्या, प्रचंड मेहनत केलेल्या पण आता शांतपणे दफन असलेल्या अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारत चला.

Survivorship Bias and art of thinking clearly

संबंधित ब्लॉग :

BLOG: मोदी-शाह मिसकॉल द्यायला का सांगताय?

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें