आनंदाचा हॅशटॅग #आंगणेवाडीजत्रा

आनंदाचा हॅशटॅग #आंगणेवाडीजत्रा

ऋषी देसाई, वृत्तनिवेदक, टीव्ही 9 मराठी

आंगणेवाडी जत्रा..  खरच हा शब्द नाही तर आजच्या सोशल मिडीयाच्या जगातला असा एक हॅशटॅगचा शब्द आहे जो तुम्हाला उच्चारला तर आनंदाचे शब्द तुम्हाला कनेक्ट होतात.. याच विषयावर बोलणारी आणि भरुन पावणारी माणसं तुम्हाला भेटत राहतात. आंगणेवाडी जत्रा हा एक दोन ओळीचा सुंदर मंत्र आहे. कि जो उच्चारला कि तुम्हाला चैतन्य निर्माण होते. आणि मग तुमच्यातील लेखक पुन्हा एकदा त्याच विषयावर नव्याने शब्दाचे गाठोडे घेऊन जत्रेच्या दुनियेत मुशाफिरी करायला निघतो. केवळ या एकाच गोष्टींमुळे मी दरवर्षी काय बरं लिहावं या ओळीने लिहायला सुरुवात करतो आणि लिहिता लिहिता पुन्हा नव्याने तीच जत्रा नव्याने उलगडत जाते..

आंगणेवाडीची जत्रा हि तुम्ही जिथून पाहता तिथून तुम्हाला ती भरून पावते. गाभाऱ्यातून दर्शन घेणाऱ्या जेवढी ती श्रद्धावान असते ना तेवढीच ती कणकवली तिठ्यावर राहूटी मध्ये ड्युटी करणाऱ्या पोलिसासाठी हि तेवढीच कर्तव्यपरायण असते. जत्रा म्हटले कि ती हौशा गवशा आणि नवशाचीच असते पण आंगणेवाडीच्या जत्रेत या म्हणजे कळेल कि हि जत्रा त्या पल्याड प्रत्येकाची असते.

हि जत्रा 48 तासा पेक्षा जास्त राबणाऱ्या एसटी कर्मचा-यांची असते. एवढ्या गर्दीचा व्याप सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांची असते. वर्षभर डोळ्यात इच्छा ठेवून केवळ दर्शन मात्रे मन कामनापूर्ती करणाऱ्या मुंबई पासून ते अगदी कर्नाटकातून पायी चालत येणाऱ्या भाविकांची असते. व्यापार उदीम झाला पाहिजे पण इथे ग्राहक नाही येणारा देवीचा भाविक आहे या श्रद्धेने व्यापार करणा-या दुकानदारांची जत्रा असते. केवळ भराडीच जिंकण्याचे बळ देते असं म्हणत आठवणीने येणाऱ्या राजकारण्यांची हि जत्रा असते. या संपूर्ण गर्दीचा मंदिर परिसरातील डोलारा सांभाळणाऱ्या आंगणे कुटुंबीय नावाचा पास गळ्यात अडकवणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याच्या अफाट प्रेरणेची हि जत्रा असते आणि सगळ्यात महत्वाचे , दर्शनासाठी आलेला भाविक  हा कुणीही असो तो माझा पाहुणा आहे त्याच्या जेवणाच्या पंगतीसाठी आतुर असलेल्या अंगणाचीही जत्रा असते.. सगळ्या सगळ्यांचीही जत्रा असते.. आंगणेवाडीच्या जत्रेत एकदा नक्की या! मराठी साहित्यात रुजलेला हौशा गवशा नवशा यांचा हा सोहळा प्रत्येकासाठी विभागला एका अनाम आनंदात जन्मला जातो आणि याच चैतन्याचे नाव असते , आंगणेवाडीची जत्रा !

खूप वर्षांपूर्वी एकदा मी पुष्करच्या यात्रेत गेलो होतो. खूप मोठी जत्रा भरते. साधारण पंधरा दिवसाचा तामझाम असतो . प्रचंड गर्दी असते. मी त्या जत्रेत श्रद्धा नावाची गोष्ट शोधत होतो. मला कुठेच नाही दिसली. जगाचे विधलिखित लिहीणा-या ब्रम्हाजींनी एकदा जरूर यावे या जत्रेत . या जत्रेत माणसे मंदिरातला देवत्व पूजतात पण जाताना असे कुणीतरी भेटते जे तुम्हाला भविष्य या एका शब्दाकडे धावणाऱ्या माझ्या पिढीला वर्तमानात जगण्याचे सुख देते !

नियोजन हा शब्द शिकण्याची आस असणाऱ्या मॅनेजमेंटच्या स्टुडंटसनी या जत्रेत जरूर यावे. इव्हेंट्स मिन्स नॉट अ पार्ट ऑफ लक, इट्स आर्ट ऑफ वर्क हे शिकायचे असेल तर या जत्रेत या..

जत्रा दर तीन वर्षांनी तरुण कार्यकर्त्यांच्या साथीने पुढे सरकत राहते पण हा वारसा जपताना   पारंपारिकपणा अगदी तसाच ठामपणे त्यांच्या देहबोलीत रुजलाय .  आणि मग भक्ती, शिस्त, संस्कार, विनम्रता, आपुलकी आणि यजमानपण यांचा मिलाफ आंगणे कुटुंबीय यांच्या स्वयंसेवकामधून ठाम दिसत राहतो. एवढ्या गर्दीचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाहीय.

मी सुरुवातीलाच म्हटले होते की  या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे. पण सगळं नव्याने उलगड्याचा हा पारंपारिक सोहळा आहे म्हणा ना.. तरीपण लिहायला घेतला की मन मुंबईत राहतच नाही. ते राजधानी आणि जनशताब्दीपेक्षाही दुप्पट वेगानं पुन्हा आंगणेवाडीच्या जत्रेत रमतं. आणि सुरु होतो आजपर्यंत पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या आठवणींचा एक विलक्षण खेळ.. जत्रेतल्या त्या पाळण्यासारखा उंचच उच आभाळाला भिडणारा. रिंगाच्या खेळात अडकलेल्या वस्तुसारखं मन आठवणीच्या रिंगात अडकून पडते. मागे कुणीही नसताना कुणीतरी त्या गर्दीत तुम्हाला ओढत राहते आणि याच भक्ती आणि अनाम शक्तीच्या आवेगाचं नाव असतं, आंगणेवाडी जत्रा…

आंगणेवाडीची भौगोलिक हद्द पाहिली तर तशी ती साधारणपणे एका बाजुला बिळवसपासून , दुस-या बाजूला बागायतपासून, तर तिस-या बाजूला चित्रम घाटीपासून साधारणपणे सुरु होतं असं महसूली उत्तर मिळेल. पण खरं सागंतो, जत्रेसाठी जाणा-या चाकरमान्यांना विचारा आंगणेवाडी कुठून सुरु होते ? ट्रॅव्हल्सने, ट्रेनने, एसटीने, खाजगी वाहनानं ज्या ज्या साधनानी प्रवास करणे शक्य आहे अशा सगळ्या वाहतुकीचे मार्ग वापरणा-यांना कुणालाही विचारा आंगणेवाडी जवळ आली कसं ओळखाल ? सर्वांच एकच उत्तर असेल वाशीची खाडी क्रॉस केली की इली आंगणेवाडी.. हे टेक्नीकली उत्तर चुकीचच असेल पण सायकॉलीजकली या पेक्षा दुसरं उत्तर असूच शकत नाही. भाविकांच्या आत लपलेल्या चाकरमान्यांच्या दृष्टीनं हे सगळं वाचताना  आणि अनुभवताना तो वेगवान प्रवास एव्हाना  उभाही झाला असेल म्हणा..

हे सगळं विलक्षण आहे आणि हेच आपलं वर्तमान आहे हे समजून जेव्हा जगू लागतो ना तेव्हा तुम्हाला इतर संदर्भांची गरज नसते.. आज धार्मिक कार्यक्रमाबद्दल लिहिताना त्या अनाम चैतन्याची आठवण येत राहते.. महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवी बद्दल लिहिताना शांतपणे आंगणेवाडीच्या गाभाऱ्यातील ते अद्वैत आठवावे आणि लिहून टाकावे.. कारण जागा , मंदिर, क्षेत्र कितीही वेगळे असले तरी तेज तेच असते शब्दातीत !!

खरं तर अनेक जण हेच विचारतील या जत्रेचे वेगळेपण काय आहे.. या जत्रेला तुम्ही किती महागडे हार तुरे पेढे अर्पण करता यावर तुमची रांग ठरत नाही.. तुम्ही कुठल्याही रांगेत उभे राहा किंवा अगदी जत्रेत नसलात तरी तुमच्या नावाचे गुलाबी पाकिटातले लाने हेच तुमच्या श्रद्धेचे एकक असते..

आठवणींचा हा देखावा मनात जपलेल देवघर आहे.. दरवर्षी आठवणीने जत्रेला बाहेर काढतो.. पुन्हा लकाकी देतो आणि मग काळजातला निरांजनाला मग पुन्हा जगण्याचे बळ मिळते म्हणून हा लेखन प्रपंच.. तोपर्यंत आंगणेवाडी यात्रा हा हॅशटॅग मनातल्या मनात उच्चारत यात्रा आठवून देहाचा सोहळा करायचा.. पुढच्या आंगणेवाडी जत्रेपर्यत… मनातल्या मनात धावत..