जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

फोर्ड ह्या कार बनवणाऱ्या अमेरीकन कंपनीनं तामिळनाडू तसच गुजरातचा प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ह्या निर्णयामुळे 4 हजार नोकऱ्या संपतील. याचाच अर्थ 4 हजार कुटूंबाला या निर्णयाची हाणी पोहोचेल. पण सर्वात मोठा सवाल हाच की फोर्ड सारख्या कंपनीला गाळा का गुंडाळावा लागला?

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या 'फोर्ड'नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर
25 वर्षानंतरही फोर्ड भारतीय बाजारात खंबीरपणे पाय रोवू शकली नाही


एखादी कंपनी का वाढत जाते आणि एखादी का बंद पडते? हा कंपनीचा दोष असतो की सरकारी धोरणांचा? देशात सध्या याच प्रश्नांची चर्चा सुरुय. त्याला कारण आहे फोर्ड ह्या कार कंपनीचं आपल्या देशातून गाशा गुंडाळणं. आधी GM म्हणजेच जनरल मोटर्स निघून गेली नंतर हार्ले डेव्हिडसन आणि आता फोर्डनेही भारतातून काढता पाय घेतलाय. मोदी विरोधक याला सरकारी धोरणाचं अपयश मानतात तर सत्ताधारी कंपनीलाच जबाबदार धरतात. त्या कंपन्यांना भारताचा बाजारच कळाला नाही असही म्हणतात. देशाला जगाची कार फॅक्टरी बनवण्याच्या घोषणा झाल्या. मेक इन इंडियाचे नारे दिले गेले. कोरोना सुरु होताच चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडणार आणि त्या आपल्याकडे येणार असं चित्रं उभं केलं गेलं. प्रत्यक्षातला वास्तव विचार करायला लावणारं आहे. त्यातच फोर्डसारखी कंपनी गाशा गुंडाळून जाणार असेल तर त्याच्या कारणांचा शोध घ्यायलाच हवा.

एका किसानपूत्राची कंपनी
फोर्ड ही जगभरात कार बनवणारी कंपनी एका शेतकऱ्याच्या मुलानं बनवलेली आहे. त्याचं नाव हेन्री फोर्ड. 30 जुलै 1863 रोजी त्याचा जन्म झाला. अमेरीकेत एक राज्य आहे मिशिगन. त्यात डेट्रॉयट नावाचं शहर आहे. त्याच शहरापासून काही अंतरावर स्प्रिंगवेल्स नावाचा भाग आहे. बहुतांश जण त्यावेळेस तिथं शेतीच करत होते. हेन्रीचेही कुटूंब काही वेगळं नव्हतं. पण हेन्रीचं डोकं काही तरी वेगळं होतं. त्यानं इयत्ता सहावीत असतानाच शाळा सोडली. 16 वर्षाचा असतानाच तो डेट्रॉयट शहरात कमावण्यासाठी आला. एका फॅक्टरीत काम करायला लागला. मशिन्समध्ये त्याला खास असा रस होता. त्यातही इंजिन जे काही कमाल करतं त्यात रुची होती. 1893 साली हेन्रीनं चार चाकांची सायकल बनवली. तीन वर्षे तिच्यात संशोधन करत राहीला आणि तीन वर्षानंतर त्याच चार चाकी सायकलमध्ये त्यानं इंजिन बसवलं. तीच फोर्डची पहिली कार.

आणि फोर्डची पहिली कार आली
1896 साली पहिली कार फोर्डनं बनवली. त्यानंतर मग हेन्रीनं कार बनवण्याचा फॉर्म्यूलाच तयार केला. 1903 साली 28 हजार डॉलरची गुंतवणूक करत फोर्ड ही कार कंपनी सुरु केली. त्यावेळेस अमेरीकेत फोर्डच्या विरोधात एकच कंपनी होती आणि ती म्हणजे जनरल मोटर्स. 1920 ते 30 च्या दशकात फोर्ड जगातल्या सर्वात मोठ्या कार कंपन्यांच्या यादीत आली. खुद्द हेन्री फोर्ड यांचीही ताकद वाढली. 1924 ला अमेरीकेत राष्ट्रपतीपदासाठी एक सर्वे करण्यात आला. त्यात हेन्री फोर्ड यांना अमेरीकन जनतेनं पहिली पसंती दर्शवली. नंतर हेन्री फोर्डनी राष्ट्रपतीपदाच्या दावेदारीतून माघार घेतली. पण त्यांचा दबदबा कायम राहीला. जर्मनी, सोव्हिएत यूनियनमध्येही फोर्डचे कार प्लांट सुरु झाले.

फोर्डचं भारतात आगमन
आता थेट 1990 मध्ये येऊया. नरसिंहराव सरकारनं उदारीकरण स्वीकारलेलं होतं. त्यामुळे परदेशी कंपन्यांसाठी आपल्या बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. हुंदई, रेनोसारख्या कंपन्यांना भारताचा रस्ता पकडलेला होता. त्यातच फोर्ड कंपनीही 1996 साली आली. त्यावेळेस फोर्डनं आपल्याकडे प्लांट सुरु करावा म्हणून महाराष्ट्र आणि तामिळनाडूत जोरदार रस्सीखेच होती. फोर्डनं महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला होता. त्यामुळे महिंद्राची पसंती महाराष्ट्र होता. महाराष्ट्र सरकारला फोर्ड आली तर रोजगार आणल्याची दवंडी पिटता आली असती. पण शेवटी फोर्ड तामिळनाडूला गेली. कारण गाड्यांना लागणारे ऑटो पार्टस त्यावेळेस तामिळनाडूतच बनत होते. त्याचं प्रमाण मोठं होतं. तेच सोयिस्कर होईल म्हणून फोर्ड तामिळनाडूची झाली.

फोर्ड हिट की फ्लॉप?
महिंद्रासोबत फोर्डनं बनवलेली पहिली कार होती एस्कॉर्ट. ती फार चालली नाही. नंतर आली IKon. त्यानंतर आणखी डझनभर ब्रँड लॉंच केले गेले. त्यातले काही मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीला उतरले, काही आपटले. हिट झालेल्यांपैकी फोर्ड फिगो आणि इकोस्पोर्टस अजूनही रस्त्यावर बऱ्यापैकी दिसतात. पण गेल्या पंचवीस वर्षातलं फोर्डचं गणित मांडायचं तर बहुतांश ब्रँड फ्लॉप गेले. भारतीय बाजारात स्वत:ची जागा निर्माण करण्यात अपयशी ठरले. गेल्यावर्षीचेच काही आकडे बघा. फोर्डला फक्त 48 हजार गाड्या विकता आल्या. चालूवर्षीही फार काही कमाल नाही करता आली. आतापर्यंत फक्त 16 हजाराच्या आसपास गाड्या विकल्या गेल्यात. हा आकडा एकूण मार्केटच्या फक्त 1.84 टक्के इतका आहे. फोर्डच्या तुलनेत अगदी वर्ष दोन वर्षापुर्वी भारतात आलेल्या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री जास्त आहे. उदाहरणच घ्यायचं तर कियाचं बघा. कियानं 75 हजार गाड्या विकल्यात. सध्या तर कियाचीच सर्वाधिक हवा आहे. त्यामुळेच विक्री नाही म्हणजे तोटा वाढणारच. फोर्डचा गेल्या दहा वर्षातला तोटा आहे 14 हजार कोटी. असं नाही की फोर्डनं स्वत:ला तोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोदींच्याच गुजरातमध्ये 2011 साली फोर्डनं सानंदला नवा प्लांट सुरु केला. काही लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. पण सगळं उलटं. फोर्ड उभीच राहू शकली नाही. तोटा वाढत गेला.

फोर्ड कुठे चुकली?
फोर्डची सगळ्यात मोठी चूक कुठली असेल तर ती आहे भारतीय बाजार न कळणं. त्यातही भारतीयांची गाड्यांची मानसिकता न कळणं किंवा कळूनही तिच्याकडे दुर्लक्ष करणं. भारत हा अमेरीका नाही. तिथं ग्राहक गाडीचं इंजिन, त्याची साईज अशा तांत्रिक बाबी जास्त पहातात. भारतीय ग्राहक पैशाचा विचार करतो. किंमत किती आहे, मायलेज किती देते, सेकंडहँड म्हणून विकायची ठरवलं तर कितीला जाणार अशा अनेक गोष्टींचा तो विचार करतो.

प्रतिमा खराब
फोर्डची बाजारातली पहिली कार एस्कॉर्ट होती. तिच्यापासूनच भारतीय बाजारात फोर्डची प्रतिमा मलिन होत गेली. एक तर ती जगभरातल्या बाजारातून आऊट झालेली होती. तिला कुणी फार किंमत देत नव्हतं. एकदा ब्रँड खराब झाला की तो उठणं खूप अवघड. फोर्डचं तसच होत गेलं. बरं सगळ्या चुका कळूनही वेळीच निर्णय घ्यायलाही फोर्डनं उशीर केला. फोर्डच्याच इकोस्पोर्टस, फिगो, फिएस्टा अशा गाड्यांनी चांगलं मार्केट कॅपचर केलं पण मारुती सुझूकी, हुंदईला ते मात देऊ शकले नाहीत. कुठल्याच रेंजमध्ये फोर्डची गाडी बेस्ट सेलर नाही झाली. भारतात फॅमिली कार ही आवडती कन्सेप्ट आहे. वॅगनर त्यामुळेच अजूनही दबदबा बनवून आहे. फोर्डचं एकही तसं मॉडेल 25 वर्षात निर्माण होऊ शकलं नाही.

फोर्डचं बिजनस मॉडेल
भारत ही एक मोठी आणि कायम बदलत राहणारी बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेचा अभ्यास जसा टाटा, मारुती, महिंद्रा यांना आहे तसा इतरांना नाही. फोर्ड त्या मानानं परदेशीच राहून गेली. इकोस्पोर्टसचं मॉडेल किंमत आणि मार्केटींगमुळे रसातळाला गेलं. फिगोचं पेट्रोल इंजिन भारी आहे पण तिच्याच बरोबरीच्या टाटा, सुझुकी, हुंदईला टक्कर नाही देऊ शकले. याचाच अर्थ असा की, फोर्डनं गाड्या खराब नाही बनवल्या पण ज्या चांगल्या बनवल्या त्याचं मार्केटींगही ते करु शकले नाहीत. आता हुंदईचच उदाहरण बघा. फोर्ड आणि हुंदई तसेच आसपासच भारतात आले. ते आले त्यावेळेस हुंदईचं फोर्ड एवढेही नाव नव्हते. पण 25 वर्षानंतर हुंदई ही देशातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या वर्षी हुंदईनं 4 लाख 71 हजार गाड्यांची विक्री केली. तिचा भारतीय बाजारातला हिस्सा हा 18 टक्क्याएवढा आहे. हुंदईची पहिली गाडी सँट्रो होती. ती अजूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसते. त्यामुळेच तिच्यावरचा विश्वास लक्षात येतो.

हेन्री फोर्डचं एक वक्तव्य आहे- अडचणींची तुम्हाला त्यावेळेस भीती वाटते जेव्हा ध्येयावरुन तुमची नजर हटते. (Obstacles are those frightful things you see when you take your eyes off the goals) फोर्डच्या कर्त्याधर्त्यांनी ही ओळ विसरल्याचं दिसतंय.

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Weekly Horoscope 12 September–18 September, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला गोड बातमी मिळणार, जाणून घ्या 12 ते 18 सप्टेंबरपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI