आमचं ठरलंय पार्ट 2 : लोकसभा मदतीची परतफेड, चंद्रकांत पाटलांचा सवाल, संजय मंडलिकांचा प्रतिसवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युती होणारच असे जाहीर केलं असताना, कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र सेना-भाजपमध्ये खडाखडी सुरू झाली आहे.

आमचं ठरलंय पार्ट 2 : लोकसभा मदतीची परतफेड, चंद्रकांत पाटलांचा सवाल, संजय मंडलिकांचा प्रतिसवाल

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’वरून (Aamcha Tharlay Part 2) लोकसभा गाजवल्यानंतर त्याचा पुढचा अंक आता विधानसभेत पाहायला मिळत आहे.  काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थिती लावली. यावरच ते थांबले नाहीत तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा देऊन ‘आमचं ठरलंय’ची (Aamcha Tharlay Part 2) परतफेड करणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या उघड भूमिकेमुळे भाजपचा मात्र तिळपापड झाला आहे.

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युती होणारच असे जाहीर केलं असताना, कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र सेना-भाजपमध्ये खडाखडी सुरू झाली आहे.

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात भूमिका घेतली. आमचं ठरलंय असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्याचा फटका महाडिक यांना बसला आणि त्यांना तब्बल दोन लाख 75 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

खासदार मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ची महत्त्वाची भूमिका असल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार अशी चिन्हे आहेत.

नुकतेच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थिती लावली. याच मेळाव्यात सतेज पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीला खासदार मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा तर दिलाच पण त्याआधी ऋतुराज पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रणही दिले.

खासदार मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून ती उघडपणे जाणवू लागली आहे.

दक्षिण मतदारसंघात आपली अडीच लाख मते आहेत. लोकसभेला ही मते धनंजय महाडिक यांना पडली असती तर त्यांचा विजय निश्चित होता असे म्हणत पालकमंत्री पाटील यांनी खासदार मंडलिक आणि शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

याला खासदार मंडलिक यांनीही प्रत्युत्तर देत लोकसभेला कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक कुठे होते, असा सवाल भाजपला केला.

शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. तर भाजपनेही गेल्या पाच वर्षात आपली व्होट बँक येथे तयार केली आहे. त्यातच माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीतील त्यांना मानणारा गट तसेच युवा शक्तीची ताकद आता भाजप सोबत असेल. त्यामुळे आपली ताकद वाढल्याचा दावा दोन्ही पक्षांचा आहे. त्यामुळेच एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न दोघांचा सुरू आहे.

एकीकडे युती दुसरीकडे वितुष्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच युती होणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोल्हापुरात मात्र युतीसाठी कोल्हापूर दक्षिण हा कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. यात ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा विषय कितपत ताणून धरतात यावर राजकीय गणित अवलंबून आहेत.

नेत्यांचं मौन

खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेससोबत जाण्याची उघड भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते मात्र यावर मौन बाळगून आहेत. काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी आलेल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावर न बोलणंच पसंत केले आहे.

संबंधित बातम्या

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर 

 ‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने  

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *