मनोज तिवारी यांना धक्का, भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला (Adesh Kumar Gupta replaces Manoj Tiwari as Delhi BJP President)

मनोज तिवारी यांना धक्का, भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

नवी दिल्ली : दिल्लीतील भाजप खासदार आणि प्रख्यात अभिनेते मनोज तिवारी यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे. भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली. दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आदेश गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुप्तांची नियुक्ती केली. (Adesh Kumar Gupta replaces Manoj Tiwari as Delhi BJP President)

मनोज तिवारी यांना पदावरुन हटवण्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपला 70 पैकी केवळ आठ जागा जिंकता आल्या. दिल्ली काबीज करता न आल्याचे पडसाद चार महिन्यानंतर उमटल्याची शक्यता आहे. मनोज तिवारी यांचे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंग पावल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

मनोज तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्लीत कोविडवर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत त्यांनी राजघाटावर आंदोलन केलं होतं. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचा : मतदानानंतर 48, मतमोजणीआधी 55 जागांचा विश्वास, मनोज तिवारींना ‘भाजप’वर जबरा कॉन्फिडन्स

याआधीही मनोज तिवारी यांच्यावर लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हरियाणामध्ये जाऊन तिवारी क्रिकेट खेळले होते. यावेळी ना त्यांनी मास्क घातला होता, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते.

भाजपचे नवे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता कोण आहेत?

मनोज तिवारी यांच्या जागी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. गुप्ता एक वर्षांपूर्वी उत्तर दिल्ली महापालिकेचे महापौर होते. व्यापारीवर्गाला आकर्षित करण्यासाठी भाजपने आदेश गुप्ता यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातल्याची चर्चा आहे. गुप्ता हे स्थानिक नेते आहेत. ते कोणे एके काळी ट्यूशन घेऊन आपलं घर चालवत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *