महाविकासआघाडीत मुख्यमंत्र्यानंतर सर्वात मोठं खातं अजित पवार यांच्याकडे : सूत्र

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदानंतरचं सर्वात महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Ajit Pawar may get Home Ministry).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:38 PM, 10 Dec 2019

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन 13 दिवस झाले आहेत (Ajit Pawar may get Home Ministry). मात्र, अद्यापही खातेवाटपाचं काम रखडलेलंच आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचाच खातेवाटप न झाल्यानं मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही अद्याप धुसरच आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदानंतरचं सर्वात महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Ajit Pawar may get Home Ministry).

अजित पवार यांना गृहमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. सरकार स्थापन होऊन 13 दिवस होऊनही खातेवाटप न होण्यामागे काही महत्त्वाच्या खात्यांवर एकमत होत नसल्याचं सांगितलं जात आहे. महाआघाडीच्या नेत्यांमध्ये तीन खात्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यात गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा समावेश आहे. या खातेवाटपाचा तिढा मुख्यत्वे शिवसेना आणि राष्ट्रवादीतच असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीकडून अर्थखात्यासह गृहखात्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. आता गृहखाते अजित पवार यांना मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार खातेवाटप लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, खातेवाटपाचा निर्णय काही झालेला नाही. महाआघाडीत कोणताही वाद नसून एकमतानं निर्णय होत असल्याचंही सांगण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, मग खातेवाटपाला उशीर का होतोय हे सांगण्यास संबंधित नेते तयार नाही. यावरुन खातेवाटपाच्या वाटाघाटीतील वाद लपवण्याचा प्रयत्न तर सुरु नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. आजही (10 डिसेंबर) महाविकासआघाडीच्या नेत्यांनी खातेवाटपावर चर्चेसाठी बैठकीचं आयोजन केलं आहे.  संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप निश्चित होईल, असंही महाविकासआघाडीच्या काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

मागील दोन दिवसांपासून गृह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं अशी चर्चा होती. मात्र, आता अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत गृहखाते आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. गृहखातं राष्ट्रवादीकडे जाणार असं दिसत असलं तरी राष्ट्रवादीत ही जबाबादारी अजित पवार यांना मिळणार की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांना मिळणार याविषयी काहीशी साशंकता व्यक्त होत आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत अजित पवार यांनीच सरशी केली आहे. अजित पवार यांच्याकडेच गृहखातं जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

गृह आणि अर्थ खाते राष्ट्रवादीकडे

महाविकास आघाडीच्या खातेवाटपात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे पाच वर्ष राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीकडे आता गृह आणि अर्थ ही दोन्ही महत्त्वाची खाती जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

राष्ट्रवादीला एकूण 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदं मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय ही मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला रस्ते विकास, आरोग्य यासारख्या मंत्रिपदांचा कार्यभार येऊ शकतो.