बाळासाहेब ठाकरे अपघात विम्याचे रोजचे 67 लाख मातोश्रीवर जातात : नाना पटोले

 भाजप शिवसेना सरकारविरोधात असलेल्या काँग्रेसची ही महापर्दाफाश अमरावतीतून सुरु करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरे अपघात विम्याचे रोजचे 67 लाख मातोश्रीवर जातात : नाना पटोले

अमरावती : रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी सरकारतर्फे बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचार मिळतात. मात्र या विमा योजनेतील पैसा हा मातोश्रीवर जातो, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांच्यावर केला आहे. भाजप शिवसेना सरकारविरोधात असलेल्या काँग्रेसची ही महापर्दाफाश अमरावतीतून सुरु करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांच्या अपघात विम्याचा पैसा हा मातोश्रीवर जातो. या बसच्या तिकीटावर विम्यासाठी 1 रुपयांचा अधिभार लावला जातो. यातून दररोज 67 लाख रुपये जमा होतात. मात्र या अधिभाराची रक्कम ही मातोश्रीवर जाते असा आरोप नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

“राज्यात आतापर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात विदर्भ पुढे आहे असे नाना पटोले यावेळी म्हटले आहे. संत गाडगे महाराज यांनी हातात खराटा घेऊन कचरा साफ केला होता. तसंच मी याच गाडगे महाराजांच्या भूमीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार झाडून साफ करणार आहे. याच कारणासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा अमरावतीतून सुरु करण्यात आली आहे,” असेही नाना पटोले म्हणाले.

“राष्ट्रसंतांच्या संतांच्या भूमीत देवेंद्र फडणवीस खोटे बोलले. भाजपची अशी ही बनवा बनवी हे नाटक अमरावती येथून सुरु झालं,” अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्षांनी विविध यात्र काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या महाजनादेश, शिवसेनेच्या जनआशीर्वाद आणि राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनंतर आता काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसतर्फे महापर्दाफाश यात्रा आयोजन करण्यात आले आहे. या महापर्दाफाश यात्रेचे नेतृत्व नाना पटोले यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान याआधीच काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. या सरकारने एखादं काम हाती घ्यावं आणि त्यात भ्रष्टाचार होऊ नये हे फारच दुर्लभ. त्यामुळे भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्ग सुद्धा याला अपवाद कसा ठरेल? सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात राहिलेल्या या महामार्गातील भ्रष्टाचाराचा आता महापर्दाफाश होणारच! अशा प्रकारच्या विविध टीका काँग्रेस भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *