ठाकरे बंधू एकत्र येताच काँग्रेसचीही मोठी घोषणा! या पक्षासोबत केली युती, निवडणुकीची समीकरणं बदलणार
Congress RSP Alliance : काँग्रेसने मोठी खेळी करत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा केली आहे. तसेच महायुतीतील पक्षांनीही आगामी निवडणूक एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप जागावाटपाची घोषणा झालेली नाही. अशातच आता काँग्रेसनेही मोठी खेळी करत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काँग्रेस-रासपची युती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीची घोषणा करताना म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेताना सोबत काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. भाजपा लोकशाहीला संपवत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आमचा विचार आहे. हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र लढल पाहिजे या विचाराने आम्ही एकत्र येत आहोत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा करत आहोत. नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्येही त्यांची आम्हाला मदत झालेली आहे. आगामी काळातही आम्ही सोबत लढू असे आम्ही जाहीर करत आहोत.
काय म्हणाले महादेव जानकर?
काँग्रेससोबतच्या युतीबाबत बोलताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, देशाचे संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससोबत राहील पाहिजे, यासाठी आम्ही काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. मला काँग्रेसने बोलवलं नव्हतं, मी स्वत:हून आलेलो आहे. कारण देशासाठी एकत्र लढण्याची गरज आहे.
LIVE || प्रदेशाध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा मध्यमांशी संवाद. https://t.co/MbAGPUnRcd
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 24, 2025
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या 288 ठिकाणी जे धोरण होत तेच धोरण महानगरपालिका निवडणुकीतही आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती. मोठ्या आघाडी झाल्या असत्या तर कदाचित कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली नसती. म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रात विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि आघाडीचा निर्णय घेण्यात आला होता. मागच्या काही काळात मुल पळवणारी टोळी आलेली होती, आता राजकीय पक्ष चोरणारी टोळी आलेली आहे.
