भाजपला मोठा फटका, माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

"राज्यभरातील अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यापैकी अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत", असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं (BJP leaders join congress).

भाजपला मोठा फटका, माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजपचे ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज (11 नोव्हेंबर) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चोरगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरुण नेते रणजित देशमुख यांनीदेखील आज मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश केला (BJP leaders join congress).

सातारा आणि ठाण्यातील भाजप नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यभरातील आणखी बरेच नेते आपल्या संपर्कात असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. “राज्यभरातील अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत”, असं थोरात यांनी सांगितलं.

“काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. ते लवकरत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला (BJP leaders join congress).

हेही वाचा : ठाकरे सरकार काही चार वर्षे चालणार नाही; पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

“काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. ‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेतच पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या”, असं आवाहन थोरात यांनी केलं.

दरम्यान, रणजित देशमुख आणि दयानंद चोरगे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार भाई जगताप, सरचिटणीस मोहन जोशी, सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस यांचा समावेश आहे.

‘या’ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला 

रणजित देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव शंकरराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंके, बाळासाहेब झेंडे, संतोषराव पवार, निलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती , माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे,नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI