सुभाष भामरेंना पाडण्यासाठी तब्बल 26 वर्षांनी अनिल गोटे पवारांना भेटले!

सुभाष भामरेंना पाडण्यासाठी तब्बल 26 वर्षांनी अनिल गोटे पवारांना भेटले!

मुंबई: धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल 26 वर्षांनी भेट झाली. भाजप आमदार अनिल गोटे हे पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले. अनिल गोटेंनी पवारांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरण असो वा कोणताही विषय, अनिल गोटे आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध राज्याने पाहिलं. मात्र आज 26 वर्षांनी दोघे एकत्र पाहायला मिळाले.

तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता, गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. धुळे मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे. मला यासाठी ज्यांची मदत घ्यायची आहे त्यांची मदत घेणार, असं अनिल गोटे यांनी पवारांच्या भेटींनतर सांगितलं.

शरद पवार यांनी सांगितलं की आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे, आम्ही आघाडीधर्म मोडणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून पवारसाहेब कळवतील, अशी माहितीही अनिल गोटेंनी दिली.

धुळे लोकसभेसाठी काँग्रेसकडून कुणाल पाटील

दरम्यान, धुळ्याची जागा आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला येते. काँग्रेसने धुळे लोकसभेसाठी कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे धुळ्यात आता कुणाल पाटील विरुद्ध सुभाष भामरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर अनिल गोटेही लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले तर इथे तिरंगी लढत होईल.

धुळे महापालिका निवडणुकीत राडा

काही महिन्यापूर्वीच धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली होती. भाजपचेच असलेल्या अनिल गोटे यांनी गिरीश महाजन आणि विशेषत: केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता.

धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळून लावली होती. तसंच स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं होतं.

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. त्यातच महापालिका निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन महापालिका निवडणुकीची तयारी केली.भाजपमध्ये डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात 2 गट पडले.

संबंधित बातम्या :  

आघाडीचे 48 पैकी 28 जागांवर उमेदवार जाहीर, संपूर्ण यादी एकाच ठिकाणी

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे  

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर 

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे

Published On - 10:59 am, Wed, 20 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI