अपघातानंतर जयकुमार गोरे यांनी कुणाला फोन केला? अपघात झाल्याचं कसं समजलं? वाचा सविस्तर…
अपघातानंतर जयकुमार गोरे यांनी कुणाला फोन केला?

मुंबई : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात (Jaykumar Gore Car Accident Update) झाला. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेत. अपघात झाल्यानंतर गोरे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याला फोन आल्याचं सांगितलं. “अपघात झाल्यानंतर साधारणपणे तीन वाजून 5 मिनिटांच्या आसपास मला फोन आला. म्हणाले की गाडीचा अपघात झालाय. सध्या नेमकं कुठं आहे हे सांगता येणं शक्य नाहीये. पण आम्ही फलटणच्या आसपास आहोत. फोन आल्यानंतर मी पाच ते दहा मिनिटात तिथं पोहोचलो. 70-80 फुटावरून गाडी खाली पडली. जयकुमार गोरे होते त्याच बाजूला गाडी आदळली त्यामुळे त्यांना दुखापत झाली”, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फोन केला. फोन करून त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फडणवीस यांनी रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनाही फोन केला. अन् योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे यांनीही फोनवरुन गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे म्हणजेच माण-खटावच्या दिशेने येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. आज पहाटे 3.30 वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
जयकुमार गोरे यांना आधी साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आलं. विशेष अॅम्ब्युलन्समधून त्यांना पुण्यात आणण्यात आलं. रुबी रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
