सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राम कदमांचा हल्लाबोल

महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अशा शब्दात राम कदम यांनी टीकेची झोड उठवली आहे.

सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राम कदमांचा हल्लाबोल
राम कदम, अनिल देशमुख


मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने अटक केली आहे. 100 कोटी रुपयांचे कथित वसुली आदेश दिल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने देशमुखांना रात्री 12 वाजता अटक केली. त्यानंतर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विटरवरुन काही सवाल उपस्थित केले आहेत. हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? असा सवाल कदम यांनी विचारला आहे.

काय म्हणाले राम कदम?

“पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” अशा शब्दात राम कदम यांनी टीकेची झोड उठवली आहे.

अनिल देशमुख यांना अटक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या मॅरेथॉन चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचं बोललं जातं. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते, मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

संबंधित बातम्या :

तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

2 महिने गायब, सकाळी ED कार्यालयात, 13 तास चौकशी, रात्री 12 वाजता अटक, ईडीने कशी कारवाई केली?

 अनिल देशमुखांना अटक, नितेश राणे म्हणतात थँक्स नवाब मलिक आणि संजय राऊत…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI