अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूक लढणार? मतदारसंघ आणि पक्ष ठरला?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूक लढणार? मतदारसंघ आणि पक्ष ठरला?


मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, उर्मिलाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान तिच्यासमोर असेल.

येत्या दोन तीन दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या फरकाने संजय निरुपम यांचा पराभव केला होता. यंदा संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी केला जातो आहे.

उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसकडून या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसकडून आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI