बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का?; संजय राऊत यांचा सवाल

देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. (Bollywood should raise voice for freedom of expression says sanjay raut)

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:33 AM, 5 Mar 2021
बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का?; संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत, शिवसेना

मुंबई: देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात दडपशाही सुरू असताना बॉलिवूडमधील दिग्गज गप्प का आहेत? असा सवाल करतानाच आवाज उठवणं केवळ तापसी पन्नू किंवा अनुराग काश्यप यांचं काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, असं आवाहनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलिवूडला केलं आहे. (Bollywood should raise voice for freedom of expression says sanjay raut)

दिग्दर्शक अनुराग काश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्या आहेत. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी बॉलिवूडला हे आवाहन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची जेव्हाही गळचेपी झाली तेव्हा सिने उद्योगाने सर्वात आधी आवाज उठवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू नये. हा लोकशाही देश आहे. मोदी लोकशाही मार्गानेच सत्तेत आले आहेत. लोकशाहीने येऊन कोणी हुकूमशाही राबवत असेल तरी हा लोकशाही देश आहे, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा. केवळ अनुराग काश्यप आणि तापसीचं हे काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत. ते गप्प का आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.

प्रादेशिक इंड्रस्ट्रीनेही आवाज उठवावा

तुमच्याकडे काही माहिती असेल तर जरूर धाडी टाका. कारवाई करा. तपास करण्याचा तुम्हाला अधिकारच आहे. पण सरकार विरोधात बोललं म्हणून धाड टाकणं गैर आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं, जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला म्हणून धाडी टाकणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोललं म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं योग्य नाही. अशा मोजक्याच लोकांवर धाडी टाकल्या जात असतील तर लोकांच्या मनात शंका येणारच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहे. गप्प राहण्यास सांगितलं जात आहे, त्यामुळे या विरोधात बॉलिवूडने आवाज उठवला पाहिजे. प्रादेशिक इंडस्ट्रीनेही त्यावर बोललं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सर्वांना पालखीचे भोई होता येत नाही

दरम्यान, आज शिवसेनेने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही या प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरलं आहे. ”काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात व पडद्यावर ज्या संघर्षमय भूमिका करतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा प्रयत्न करतात. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा चित्रपटांत तापसीने केलेल्या भूमिका ज्यांनी पाहिल्या त्यांना तापसी इतकी बाणेदार का? असे कोडे पडणार नाही. अनुराग कश्यपच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. त्यांचे विचार कदाचित पटत नसतील, पण त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच. दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेताच तिच्याबाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. दीपिकाचे चित्रपट ठरवून पाडण्याचे प्रयोग झालेच, पण समाजमाध्यमांवर तिच्याविरुद्ध घाणेरड्या मोहिमादेखील राबविण्यात आल्या. हे सर्व करणारे कोण आहेत किंवा कोणत्या विचारप्रवाहाचे आहेत ते सोडून द्या, पण अशा कृतीतून ते देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढवत नाहीत. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. गोमांस प्रकरणात झुंड-बळी गेले, पण भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री जोरात सुरूच आहे. यावर कोणीच कसे बोलायचे नाही?,” असं समनात म्हटंल आहे. तसेच, आपल्या अग्रलेखात सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन सध्या देशात होत असल्याचे म्हणत “केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचे स्वातंत्र्यही जळून गेले आहे. तापसी, अनुराग कश्यपप्रकरणी तेच घडले आहे,” असा दावा शिवसेनेने केला आहे. (Bollywood should raise voice for freedom of expression says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

बॉलिवूडमध्ये सर्व व्यवहार स्वच्छ, पारदर्शक; अपवाद फक्त अनुराग, तापसीचा?, सामना अग्रलेखात केंद्राला फटकारे

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला एका दिवसात बेड्या!, उपमुख्यमंत्री अजिदादांनी शब्द पाळला

Video : ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’, महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट, भाजप भिडणार?

(Bollywood should raise voice for freedom of expression says sanjay raut)