ठाकरे सरकारचा फडणवीस समर्थक भाजप आमदाराला दणका

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची 'सिडको'च्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारचा फडणवीस समर्थक भाजप आमदाराला दणका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला पहिला मोठा दणका (CM Thackeray Shocks BJP MLA) देण्यात आला आहे. महामंडळावरचे जुने अध्यक्ष हटवायला सुरुवात करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2018 मध्ये प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक मानले जातात.

‘सिडको’च्या अध्यक्षपदी आता नवीन चेहरा दिसणार आहे. मंत्रिमंडळात वर्णी न लागलेल्या एखाद्या नाराज आमदाराला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीसांच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तज्ज्ञ संचालकांच्या झालेल्या नियुक्त्याही कालच्या बैठकीत रद्द करण्यात आल्या होत्या. फडणवीस सरकारने 13 जून 2015 पासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तज्ज्ञ संचालकांच्या (विशेष निमंत्रितांच्या) नियुक्त्यांसाठी तरतूद केली होती.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर फेरविचाराचं धोरण अवलंबलं आहे. काही निर्णयांना स्थगिती मिळाली आहे, तर काही निर्णय रद्दही करण्यात आले आहेत. अशातच फडणवीसांनी केलेली नियुक्ती रद्द करत भाजपला दणका (CM Thackeray Shocks BJP MLA) देण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI