सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी : उद्धव ठाकरे

शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली (CM Uddhav Thackeray Saamana interview).

सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी : उद्धव ठाकरे

मुंबई : “महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘सामना’च्या मुलाखतीत म्हणाले (CM Uddhav Thackeray Saamana interview). शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली (CM Uddhav Thackeray Saamana interview).

“रिक्षा हे गरिबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करुन घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. नाही, मी एवढंच म्हटलंय, मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“माझं मत मी लोकांसोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं… ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देतात?

“महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहेत. यापैकी काँग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीक्र नव्हता. शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात. म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची ती चूक आहे अशातला भाग नाही. तशा आशाअपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाही. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो”, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडीत कुरबुरी?

“महाविकास आघाडीत कुरबुरी नाहीत. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. आताच मी वाचलं की, आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोकराव असतील किंवा धनंजय मुंडे हे आजारी पडले होते. सुदैवाने ते बरे झाले आहेत. जितेंद्र तर फारच गंभीर होते. अशा परिस्थितीत या भेटीगाठी थोड्याशा अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरुन किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोड्याफार सुरु असतात”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“आता आपण कॅबिनेट मीटिंगसुद्धा करतो, अर्थात ती थोडी विस्तारली आहे. म्हणजे काही मंत्री त्यांच्या त्यांच्या कार्यालयात किंवा जिथे असतील तिथून मीटिंगला बसतात. मी घरुन म्हणजे ‘मातोश्री’वरुन सहभागी होतो. मंत्रालयात काही जण भाग घेतात. अशी सगळे जण पसरुन ती कॅबिनेट घ्यावी लागते. कारण एकत्र एकाच ठिकाणी बसणं सध्या तरी शक्य नाही. जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि आम्हीच ते मोडायचे हे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही ही खबरदारी घेतोय”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *