थिल्लर-चिल्लरकडे बघायला वेळ नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

केंद्राकडे जीएसटीचे पैसे अडकले आहेत. त्यांनी जर हे पैसे दिले असते तर आपणही तेलंगनाप्रमाणे मदतीचं वाटप सुरू केलं असतं, असं सांगतानाच सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • संतोष जाधव, टीव्ही9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 17:06 PM, 21 Oct 2020
CM Thackeray Shocks BJP MLA

उस्मानाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरबाजी करणं शोभत नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. माझ्यासमोर माझी जनता आहे. शेतकरी आहे. थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळच नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. (cm uddhav thackeray slams devendra fadnavis)

उस्मानाबाद येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल डिवचले असता त्यांनी ही टीका केली. माझ्यासमोर शेतकरी आहे. त्यांची दु:ख आहे. जनता आहे. त्यामुळे थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळच नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तर तेलंगनासारखी मदत करता आली असती

तेलंगना सरकारने कोणत्याही पंचनाम्याची वाट न पाहता अतिवृष्टीग्रस्ताना मदतीचं वाटप सुरू केलं आहे. महाराष्ट्र सरकार असा निर्णय का घेऊ शकत नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांना प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर तेलंगनाने मदत वाटप सुरू केली ही चांगली गोष्ट आहे. माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मोठ्या जोशात मदतीची मदत करायची आणि मध्येच थांबायचं हे बरोबर नाही. दिवाळी-दसरा आहे. सणासुदीत माझ्या लोकांच्या डोळ्यात मला अश्रू पाह्यचे नाही, असं सांगतानाच केंद्राकडे जीएसटीचे पैसे अडकले आहेत. त्यांनी जर हे पैसे दिले असते तर आपणही तेलंगनाप्रमाणे मदतीचं वाटप सुरू केलं असतं, असं सांगतानाच सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड रोखण्यासाठी महाराष्ट्राने ज्यापद्धतीने आरोग्य सेवा उभ्या केल्या तशा आरोग्य सेवा देशातील एकाही राज्यात निर्माण झाल्या नसतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

शेतकरी संकटात आहे. अनेकांची घरंदारं वाहून गेली आहे. जमीन पडीक झाली आहे. अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं मी दिलासा देण्यासाठी आलो आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. ठोस मदत देणार आहे. पंचनामेही होत आले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुंबईत काम सुरू आहे. गुरंढोरं, घरांची नासधूस, पिकांची नासधूस आणि मनुष्यहानी यासाठीही मदत दिली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray slams devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

मी सुद्धा भाजपाचा राजीनामा देतेय, रोहिणी खडसेंचाही एल्गार

भाजपचा हात सोडताच खडसेंचं ट्विटरवर नवं रुप, नाव आणि कव्हरपेजही बदललं

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

(cm uddhav thackeray slams devendra fadnavis)