मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर फोडू नका, मुख्यमंत्र्यांनी दिलेली तंबीही मंत्र्यांनी ‘फोडली’

मंत्र्यांनी बैठकीतील चर्चांविषयी तोंडावर बोट ठेवावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर फोडू नका, मुख्यमंत्र्यांनी दिलेली तंबीही मंत्र्यांनी 'फोडली'
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणाऱ्या चर्चा बाहेर सांगू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्र्यांना ताकीद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळात होणार्‍या चर्चांचे फोटो बाहेर पडल्याने उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना धारेवर धरल्याचं (CM Warns not to leak Cabinet News) म्हटलं जातं. गमतीचा भाग म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या तंबीलाही पाय फुटले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकार्‍यांना बाहेर थांबण्यास सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच अशा सूचना दिल्याने अधिकारीही चक्रावले. अधिकारी बाहेर जाताच उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड मंत्र्यांचा ‘एक्स्ट्रा क्लास’ घेतला. जवळपास तासभर ही शाळा चालली.

मंत्रिमंडळ आणि इतर बैठकांमधील चर्चा बाहेर फुटत असल्यामुळे सरकारची बदनामी होते. बैठकीत गुप्‍तता राहणं महत्त्वाचं आहे. इथल्या बातम्या बाहेर फुटल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. तेव्हा मंत्र्यांनी बैठकीतील चर्चांविषयी तोंडावर बोट ठेवावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे असल्याने आपल्याला समन्वय आणि जबाबदारीने चालवावे लागणार आहे. त्यामुळे संयम बाळगण्यास सांगत उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव करुन दिली.

सरकारचे कामकाज वेगाने चालले आहे, असं चित्र दिसलं पाहिजे. यासाठी मंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गमतीचा भाग हा, की बैठकीतील चर्चांविषयी गुप्तता बाळगण्याचा दिलेला सल्लाही गुप्त राहिला (CM Warns not to leak Cabinet News) नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI