Mahajobs | ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान, ‘या’ नेत्याचा फोटो

Mahajobs | 'महाजॉब्स'च्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान, 'या' नेत्याचा फोटो

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.

अनिश बेंद्रे

|

Aug 02, 2020 | 11:37 AM

मुंबई : ‘महाजॉब्स’ पोर्टलच्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान देण्यात आले आहे. महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. (Congress State President Balasaheb Thorat photo on Mahajobs Portal)

महाजॉब्सच्या याआधीच्या जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचा फोटो नव्हता. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य फोटो डावीकडे आहे, तर उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत.

नेमकं प्रकरण काय?

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी जुलै महिन्यात सवाल उपस्थित केला होता. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही” असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले होते.

सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन आपली खदखद व्यक्त केली. सत्यजीत तांबे म्हणाले होते की, “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे”

हेही वाचा : शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

या जाहिरातीवर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही आक्षेप घेतला होता. राजीव सातव यांनी ट्वीट करुन त्यांचं म्हणणं मांडलं होतं. “योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत.”

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी त्यावेळी टीव्ही 9 मराठीला सांगितलं होतं.

वेबसाईटच्या होमपेजवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे फोटो

सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त केली असली, तरी त्याआधीपासूनच  http://mahajobs.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या होमपेजवर डावीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे फोटो आहेत. तर उजव्या बाजूला संबंधित खात्याचे मंत्री म्हणजेच उद्योग मंत्री सुभाष देसाई (शिवसेना), कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) आणि कौशल विकास मंत्री नवाब मलिक (राष्ट्रवादी) यांचे फोटो आहेत. (Congress State President Balasaheb Thorat photo on Mahajobs Portal)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें