दलित, महिला की ओबीसी चेहरा? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? सहा राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलणार
केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता लोकांच्या नजरा भारतीय जनता पक्षाच्या नव्या अध्यक्षाकडे लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यासोबतच सहा राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तयारीही भाजपने सुरु केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्य नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात एक प्रमुख नाव आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा. त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. जेपी नड्डा यांचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. त्यातच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यासोबतच सहा राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तयारीही भाज्क्सून करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीत आरएसएसची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणे आहे. कारण, जेपी नड्डा यांनी भाजप इतका शक्तिशाली झाला आहे की तो आरएसएसच्या समर्थनाशिवायही काम करू शकतो अशी टिप्पणी केल्यामुळे आरएसएस खूप संतापली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा सरकारमध्ये गृहमंत्री बनले. त्यावेळी जेपी नड्डा यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपला. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांचे उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपने एक व्यक्ती – एक पद हे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे भाजपला आता नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे.
पूर्णवेळ अध्यक्ष यांच्यासोबतच नवीन कार्याध्यक्ष निवडीबाबतचाही विचार भाजप नेतृत्वाला करावा लागणार आहे. मात्र, या पदासाठी भाजपकडून ओबीसी, दलित आणि महिला व्यक्ती देण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासोबतच आरएसएससोबत सखोल संबंध असलेल्या व्यक्तीलाच या पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कशी होते राष्ट्रीय अध्यक्षाची निवड?
भाजपच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. यात राष्ट्रीय आणि राज्य परिषदांचे सदस्य असतात. राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजचे कोणतेही 20 सदस्य अशा व्यक्तीचा प्रस्ताव देऊ शकतात जो चार टर्मसाठी सक्रिय सदस्य आहे आणि ज्याचे सदस्यत्व 15 वर्षे आहे. मात्र, राष्ट्रीय परिषदेच्या निवडणुका पूर्ण झालेल्या किमान पाच राज्यांमधून संयुक्त प्रस्ताव येणे आवश्यक आहे.
भाजप पुढील महिन्यापासून पक्ष नवीन सदस्यत्व मोहिमेसह संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणार आहे. या मालिकेत प्रथम विभाग, जिल्हा आणि राज्य संघटनेच्या निवडणुका होतील. 50 टक्के राज्यांतील निवडणुकानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे. तथापि, भाजपच्या घटनेत पक्षाच्या सर्वोच्च मंडळ, संसदीय मंडळाला, आपत्कालीन परिस्थितीत अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकाळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाचे संसदीय मंडळ नड्डा यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवू शकते किंवा नवीन अध्यक्षाची नियुक्तीही करू शकते.
या 6 राज्यांमध्ये भाजपचे नेतृत्वही बदलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सलग तीन विजयांमध्ये महिला मतदारांची निर्णायक भूमिका मान्य केली आहे. अलीकडच्या काळात भाजपने महिला नेतृत्वावर भर दिला आहे. यासोबतच पक्षात महिला सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी भाजप व्यापक संपर्क अभियानही राबवत आहे. हे लक्षात घेता एका महिलेकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजप केवळ राष्ट्रीय अध्यक्षच नाही तर 6 राज्यांमधील पक्ष नेतृत्व बदलण्याची तयारी करत आहे. त्याची प्रक्रियाही लवकरच सुरु होणार आहे.
मात्र, नड्डा यांच्यानंतर ज्या नेत्यांकडे संभाव्य राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाहिले जात होते त्यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पक्ष आपल्या राज्यातील प्रमुख चेहऱ्यांना किंवा कोणत्याही राष्ट्रीय सरचिटणीसांना सर्वोच्च पदावर बढती देऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता उत्तर प्रदेश राज्यात नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार केंद्रीय मंत्री झाले आहेत. तर बिहारचे अध्यक्ष सम्राट चौधरी हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे देखील राज्यातील पक्षप्रमुख आहेत. तेलंगणातही केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे अध्यक्षपद भूषवत आहेत. गुजरातचे अध्यक्ष सीआर पाटील हे ही केंद्रात मंत्री झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजाचे आहेत. तर अध्यक्ष सीपी जोशी हे देखील ब्राह्मण समाजाचेच आहेत. त्यामुळे त्याच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष येण्याची शक्यता आहे असेही या सूत्रांनी सांगितले.
