अन् म्हणून भाजपासोबत जाण्याचं ठरवलं, अखेर अजित पवारांनी ते गुपित सांगितलं!
अजित पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नाचे जाहीर सभेत उत्तर दिले आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते महायुतीचा एक घटकपक्ष असून सत्तेत सहभागी आहेत. विशेष म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचे अनेक नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. दरम्यान, त्यांनी भाजपासोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेकजण आक्षेप घेतात. भाजपा आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे, असे असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? असे विचारले जाते. त्यांनी याच प्रश्नाचे आज थेट आणि जाहीर उत्तर दिले आहे. राज्याचा विकास, राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मला काहीजण विचारतात की….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त अजित पवार यांच्या पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याची सविस्तर माहिती दिली आहे. मला काहीजण विचारतात की तुम्ही भाजपासोबत का गेले? पण मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि…
तसेच, आपण काही साधूसंत नाही. आपण लोकांना दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत. त्यामुळेच आपण भाजपासोबत, एनडीएसोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचं ठरवलं, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
आजही अनेकजण एनडीएसोबत…
धर्मनिरपेक्षाता विचारधारा जपणारे चंद्राबाबू नायडू ते एनडीएसोबत गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधीकाळी एनडीएसोबत होत्या. लालू प्रसाद यादव हेही एनडीएसोबत होते. आजही अनेकजण एनडीएसोबत आहेत. शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे, भाजपासोबत जाण्याचा विचार होता, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
