मुंबई महापालिकेची निवडणूक कशी होणार?; अजित पवार यांनी दिली सर्वात मोठी माहिती
अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर मोठं भाष्य केलंय. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन केले आहे.

BMC Election : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आगमी काही दिवसांत कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या निवडणुकीत राज्यभरात मुंबई महापालिकेची विशेष चर्चा आहे. कारण या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी हे नेते रणनीती आखत आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, याबाबत मोठी माहिती दिली आहे.
शेवटच्या कार्यकर्त्यालाही….
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी भाषण केलं. याच भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन केले. तसेच काहीही झालं तरी शेवटच्या कार्यकर्त्यालाही पद मिळालं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीची रणनीती काय असेल, तसेच ही निवडणूक नेमकी कशी होईल, याबाबत सांगितलं.
सत्तेत असलो तरी…
सत्ता येईल आणि जाईल. ताम्रपट कुणी घेऊन आलं नाही. पण पुरोगामी विचार कायम राहिला पाहिजे. आदिवासी, दलितांचं संरक्षण झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. सत्तेत असलो तरी आणि सत्तेत नसलो तरी आपल्याला ही जबाबदारी पार पाडावी लागेल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
आपण कधीही तडजोड केली जाणार नाही. पुरोगामी विचाराने हा पक्ष पुढे जाईल. ज्या दिवशी विचारांची तडजोड करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच दिवशी या पक्षाचा पाया कमकुवत होईल. त्याला तडा गेल्या शिवाय राहणार नाही. ही विचाराची लढाई आहे. विचारानेच लढायची आहे, असा संदेश त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
मुंबई पालिका निवडणुकीविषयी नेमकं काय सांगितलं?
पुढे मुंबईच्या महापालिका निवडणुकीवर त्यांनी भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोमात कामाला लागावं लागेल. चार महिने बाकी आहेत. बघता बघता दिवस निघून जातील. कामाला लागा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तसेच मुंबईत वॉर्डवाइज निवडणूक होईल. प्रत्येक वॉर्डाची निवडणूक होईल. दुसरीकडे चारचा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. वॉर्ड कितीचा असावा याबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. आपल्याला बहुजनांचा आदर करून पुढे जायचं आहे. कसेही वॉर्ड पडू द्या. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. आपण जोमाने काम करायचं आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला.