राज-फडणवीस भेट, खडसे-महाजन म्हणतात, काहीही होऊ शकतं!

राज्यात नव्या राजकीय समीकरणांसाठी जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या दोन पक्षांनी एकमेकांवर सडकून टीका केली (BJP on alliance with MNS).

राज-फडणवीस भेट, खडसे-महाजन म्हणतात, काहीही होऊ शकतं!

मुंबई : राज्यात नव्या राजकीय समीकरणांसाठी जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या दोन पक्षांनी एकमेकांवर सडकून टीका केली (BJP on alliance with MNS). वेळोवेळी एकमेकांचे वाभाडेही काढले. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार आता एकमेकांचे पक्के शत्रू नव्या राजकीय मैत्रीच्या शक्यता तपासताना दिसत आहेत (BJP on alliance with MNS).

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजप जवळ येताना दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या भेटीनंतर सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. या भेटीबद्दल  एकनाथ खडसे यांनी देखील आपलं मत मांडलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यात काय चर्चा झाली याविषयी मला माहिती नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दूर गेला आहे. जर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक काही चर्चा झाली असेल, तर या मतांचं धृवीकरण होऊ शकतं.”

खडसे यांनी यातून भविष्यात हिंदुत्वाच्या राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून मनसे-भाजप युतीचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनीही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर सूचक वक्तव्य केलं. गिरीश महाजन म्हणाले, “राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी आज सांगू शकणार नाही. मलाही त्याची कल्पना नाही. परंतु निश्चित मनसेने एक थोडी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं आहे.”

राज्यात एक मोठी पोकळी तयार होत आहे. मी त्याबाबत बोलणार नाही. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नाही. सध्या काय काय सुरु आहे हे आपण पाहतो. शिवसेना काँग्रस-राष्ट्रवादीसोबत चालली आहे. ते कुणाच्याही मंचावर जातात बसतात. त्यामुळे राजकारणात काहीही कठीण नाही. मनसे आणि आम्ही तर एकाच विचाराचे आहोत. आमचे विचार टोकाचे किंवा वेगळे नाहीत, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

आता राज ठाकरे मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात याबाबत भूमिका घेणार का आणि काय भूमिका घेणार याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांचं लक्ष लागून आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI