Eknath Shinde: दसऱ्यानंतर शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांची सुट्टी, एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार? राज्यात मोठे फेरबदल?
Eknath Shinde: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांच्या कामांवर एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठे काही घडणार असल्याचे म्हटले जात आहे.

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे वारे वाहू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांच्या मते, शिंदे गटातील शिवसेनेत अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला सारून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे राज्यात राजकीय हलचाली तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना काही मंत्र्यांनी अपेक्षित कामगिरी न दिल्याने शिंदे नाराज झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तरुण आणि सक्रिय आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
दसऱ्यानंतरच्या काळात मोठे काही तरी घडणार
राजकीय वर्तुळात असेही चर्चेत आहे की, काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांची पदोन्नती केली जाऊ शकते. यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत समीकरणे नव्याने जुळवली जाणार आहेत. दसऱ्यानंतरच्या काळात शिंदे यांनी ‘भाकरी फिरवण्याची’ तयारी केल्याचे सूत्रे सांगत आहेत. म्हणजेच सध्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
या फेरबदलांमागे पक्षांतर्गत एकजूट राखणे आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्याची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. हिवाळी अधिवेशन जवळ आले असताना प्रशासनिक कामकाजातील गती वाढवणे आणि पक्षाला अधिक सक्रिय करणे हे उद्दिष्ट असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तरुण नेतृत्वाला संधी देऊन शिंदे गट नव्या पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे. सध्या याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरू आहे. दसऱ्यानंतरच्या काळात शिंदेंच्या कॅबिनेटमधील बदलांबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मोठे फेरबदल होतील का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
