‘आप’ महिला उमेदवाराबाबत अश्लील पत्रके वाटली, गौतमवर ‘गंभीर’ आरोप

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 10:30 AM, 10 May 2019
‘आप’ महिला उमेदवाराबाबत अश्लील पत्रके वाटली, गौतमवर ‘गंभीर’ आरोप

वी दिल्ली : माजी क्रिक्रेटर आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि शिक्षणतज्ज्ञ आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केला आहे. गौतम गंभीर निवडणूक जिंकण्यासाठी माझ्याविरोधात अश्लील पत्रके वाटत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. गौतम गंभीर भाजपकडून, तर आतिशी आपकडून पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात निवडणूक मैदानात आहेत.

आपने या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात आपने गंभीरवर अश्लील पत्रके वाटण्याचा आरोप केला. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, “पत्रके वाचताना आम्हाला लाज वाटते. गौतम गंभीर देशासाठी खेळताना जेव्हा चौकार आणि षटकार मारायचे तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायचो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी ते एवढ्या खालच्या स्तरावर उतरतील याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता.”

काय आहे या पत्रकात?

संबंधित पत्रकांमध्ये आप नेत्या आतिशी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आईविरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आहे.

एवढ्या खालच्या स्तरावर उतरुन महिलांची सुरक्षा कशी करणार

आप नेत्या आतिशी यांनी गौतम गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आतिशी म्हणाल्या, “माझ्यासारख्या सशक्त महिला उमेदवाराचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या स्तरावर उतरला. मग खासदार झाल्यावर आपल्या मतदारसंघातील महिलांची सुरक्षा कसी करणार?”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गंभीरवर टीका केली. गौतम गंभीर एवढ्या खालच्या स्तरावर जाईल याची कल्पना नव्हती. जर अशा मानसिकतेचे लोक निवडून गेले तर महिलांना कसे सुरक्षित वाटेल, असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले.

आरोप सिद्ध झाल्यास उमेदवारी मागे घेईल

गौतम गंभीर यांनी आतिशी यांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच जर आतिशी यांनी त्यांचे आरोप सिद्ध केले, तर मी माझी निवडणूक उमेदवारी मागे घेईन, असे मत त्यांनी व्यक्त केले. गंभीर यांनी या आरोपांनंतर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच निवडणुकीसाठी त्यांच्या महिला सहकाऱ्याची बदनामी केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “तुम्ही निवडणुकीसाठी स्वतःच्याच महिला सहकाऱ्याची बदनामी केली. याबद्दल तिरस्कार वाटतो. तुम्ही समाजातील घाण आहात. कुणीतरी तुमच्याच झाडूने तुमच्या मनातील घाण साफ करण्याची गरज आहे.”

गौतम गंभीर यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये केजरीवाल आणि आतिशी यांना जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले, “जर आतिशी यांनी त्यांचे आरोप सिद्ध केले, तर मी माझी निवडणूक उमेदवारी मागे घेईल.”

“उलटा चोर कोतवाल को डाँटे?”

दरम्यान, गंभीर यांनी आतिशी यांच्यासह अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. यावर बोलताना सिसोदियांनी गंभीरवर जोरदार टीका केली. सिसोदीया म्हणाले, “या कृतीसाठी तुम्ही माफी मागायला हवी होती, पण तुम्ही अब्रुनुकसानीच्या खटल्याची धमकी देत आहात. हे पत्रक वाटण्याची तुमची हिंमत कशी झाली? वरुन याचे आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर लावत आहात. अब्रुनुकसानीचा दावा तर आम्ही करणार आता.”

आपच्या नेत्या आतिशीबाबत अश्लील पत्रकांप्रकरणी महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस

दिल्ली महिला आयोगाने आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आतिशी यांच्याविरोधात अश्लील पत्रकांप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. माध्यमांमध्ये यासंबंधी बातम्या आल्यानंतर महिला आयोगाने स्वतः याची दखल घेतली. नोटीसमध्ये आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या पत्रकांना लज्जास्पद म्हटले. तसेच हा प्रकार एका महिला उमेदवाराच्या चारित्र्यावर आणि सन्मानावर हल्ला आहे, असेही मालीवाल म्हणाल्या.

आयोगाने या प्रकरणाला गंभीरपणे घेत पूर्व दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाने पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल झाली की नाही, झाली एफआयआर दाखल नसेल तर का नाही, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे का? याची माहिती मागितली आहे. आयोगाने पोलिसांना शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत या प्रश्नांची उत्तरे आणि तपासाची सद्यस्थितीबाबत माहिती मागवली आहे.