तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा

तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा
इशा झा आणि हर्षवर्धन जाधव

हर्षवर्धन जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात केली. (Harshavardhan Jadhav Isha Jha Speech)

अनिश बेंद्रे

|

Mar 02, 2021 | 9:28 AM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्या राजकीय सभेत भाषण करणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि मैत्रीण इशा झा (Isha Jha) सध्या चर्चेत आहेत. “कधीही कुठला प्रॉब्लेम आला, तरी राजकीय नेत्याकडे जाऊ नका, कारण आपल्या देशातील नेताच सगळ्यात मोठा गुंड आहे” असं म्हणत इशा झा यांनी राजकारणातील गुंडशाहीवर बोट ठेवलं. या सभेत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचं गुणगानही गायलं. (Harshavardhan Jadhav colleague Friend Isha Jha Speech)

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित सभेत आपली आगामी रणनीती जाहीर केली. या सभेत इशा झा यांनी भाषण केलं. जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात केली.

भाषणात काय म्हणाल्या इशा झा?

“आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र कुटुंबाकडून हेच शिकले, की कधीही कुठला प्रॉब्लेम आला, तरी राजकीय नेत्याकडे जाऊ नका, कारण आपल्या देशातील नेताच सगळ्यात मोठा गुंड आहे. ऐकून खूप आश्चर्य वाटायचं, नंतर तसे अनुभवही आले. अनेक नेते चौथी नापास आहेत. आमच्याकडूनच पैसे घेतात, आणि आमचेच हक्क हिरावतात आणि अधिराज्य गाजवतात” असं इशा झा भाषणात म्हणाल्या.

“लोकप्रतिनिधींना डिग्रीच लागत नाही”

“देशाविषयी प्रेम असल्यामुळे नेत्यांकडून होणारी लूट पाहून दुःख व्हायचं. सैन्यात जायचं असेल, तर कठोर मेहनत लागते. डॉक्टर व्हायचं तर पाच सहा वर्ष शिकून डिग्री मिळवावी लागते, इंजिनिअरला डिग्री लागते. मात्र लोकप्रतिनिधी होण्यासाठी कुठलीही डिग्री लागत नाही. कोणीही शिक्षण किती झालं, हे विचारत नाही. मान्य आहे की आपल्या देशात लोकशाही आहे, आणि लोकच ठरवतात की त्यांचा नेता कोण. पण लोकांची जबाबदारी आहे की, आपण कोणाला निवडत आहोत, हे पाहावं. त्याला समजतं का, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे का, हे पाहावं” असा सवाल इशा झा यांनी विचारला.

“हर्षवर्धन जाधवांच्या ज्ञानाने अधिकारी गपगार”

“मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा झा हर्षवर्धन जाधवांचं कौतुक करत होत्या.

संत कबीर यांच्या दोह्याने भाषणाची अखेर

“आयुष्यात कितीही खाचखळगे आले, तरी हर्षवर्धन जाधव जनतेसाठी पुन्हा उभे राहिले. समाजाचा विकास आणि जातपात नष्ट करण्यासाठी ते झटत आले आहेत. संत कबीर यांचा दोहा इशा झांनी भाषणाच्या अखेरीस सांगितला. “बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर, पंछी को छाया नही, फल लागे अतिदूर..” म्हणजेच तुम्ही कितीही मोठे व्हा, त्याचा समाजाला फायदा झाला नाही, तर त्याचं काहीच महत्त्व नाही” असा अर्थ सांगत इशा झा यांनी साडेपाच मिनिटांच्या भाषणाची अखेर केली. (Harshavardhan Jadhav colleague Friend Isha Jha Speech)

कोण आहेत इशा झा? (Who is Isha Jha Read Profile)

इशा झा या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी. जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे.

दुचाकीस्वार मारहाण प्रकरणी चर्चेत

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश

हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेची शक्यता, पोलीस मारहाण प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी

(Harshavardhan Jadhav colleague Friend Isha Jha Speech)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें