प्रियांका गांधींना खासदार करण्यासाठी काँग्रेसचा ‘अमेठी प्लॅन’?

प्रियांका गांधींना खासदार करण्यासाठी काँग्रेसचा 'अमेठी प्लॅन'?

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींना खासदार करण्याचा काँग्रेसचा प्लॅन तयार झाल्याचं दिसतंय. कारण, खुद्द प्रियांका गांधींनीच याबाबत संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवर ते जिंकल्यास अमेठीची जागा ते प्रियांका गांधींसाठी सोडू शकतात, असं बोललं जातंय.

राहुल गांधी दोन्ही जागांवर जिंकल्यास त्यांना एक जागा सोडावी लागेल. या परिस्थितीमध्ये ते अमेठीची जागा सोडू शकतात. या जागी होणारी पोटनिवडणूक लढण्याचे संकेत प्रियांका गांधींनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दिले. राहुल गांधींनी अमेठीची जागा सोडल्यास तुम्ही तिथून निवडणूक लढणार का, असा प्रश्ना प्रियांकांना विचारण्यात आला. ‘हे फार आव्हान नसेल’ असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. राहुल गांधी दोन्ही ठिकाणी जिंकल्यास चर्चा होईल, असं त्या म्हणाल्या.

अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीही याच मतदारसंघातून निवडणूक लढायचे. 2004 मध्ये राहुल गांधींनी पहिल्यांदा इथे विजय मिळवला. त्यानंतर 2009 आणि 2014 चीही निवडणूक जिंकली. पण 2014 ला भाजपने स्मृती इराणी यांच्या रुपाने मोठं आव्हान निर्माण केलं होतं. यावेळीही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढत असल्याचं बोललं जातं. दोन्ही जागा जिंकल्यास एक जागा रिक्त करावी लागते. यानंतर सोडलेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होते.

अमेठीत राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा थेट सामना आहे. कारण, इथे सपा आणि बसपा यांच्या आघाडीने उमेदवार दिलेला नाही. 2014 च्या निवडणुकीत इते स्मृती इराणी यांनी राहुल गांधींची दमछाक केली होती. यावेळीही भाजपचं पारडं जड मानलं जातंय. मात्र मतदानापूर्वी प्रियांका गांधी यांनी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली. भाजपचे काही नेतेही काँग्रेसच्या गळाला लागले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI