15 दिवसात पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा 16 व्या दिवशी… : उद्धव ठाकरे

येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा 16 व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल असा धमकीवजा इशारा उद्धव ठाकरेंनी बँकांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने हा मोर्चा काढण्यात आला.

15 दिवसात पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा 16 व्या दिवशी... : उद्धव ठाकरे


मुंबई : शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (17 जुलै) विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा 16 व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल असा धमकीवजा इशारा उद्धव ठाकरेंनी बँकांना आणि विमा कंपन्यांना दिला आहे. तसेच येत्या 15 दिवसात मला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत असेही उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.

वांद्रे कुर्ला संकुलातील काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री मोर्चात सहभागी झाले होते.

“मुंबईत शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन काय करणार ? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण ही वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालय बघून ठेवा या ठिकाणी काही दिवसांनी आपल्याला धडकावे लागणार आहे असे उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितले.”

या मोर्चावर टीका करणारे नक्की शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. “सामना या वृत्तपत्रातील आजचा अग्रलेख मुद्दाम वाचा त्यात तुम्हाला हा शेतकऱ्यांचा मोर्चा कशासाठी आहे ते समजेल. मुंबईसाठी शेतकऱ्यांनीही रक्त सांडले आहे. टीका करणाऱ्या लोकांच्या रक्तातच भेसळ असेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.”

राज्यात सध्या कोणचे सरकार हा भाग वेगळा आहे. आमच्यासाठी माणुसकी महत्त्वाची  आहे. आम्ही माणुसकी जपणारी माणसे आहोत. ज्यांनी शिवसेना आणि युतीला मते दिली असतील त्यांच्या प्रत्येक मताला उत्तर देण्यास मी बांधील आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“विजय मल्ल्या, नीरव मोदी यासारखे मोठे मोठे लोक देश सोडून गेले आणि माझा शेतकरी हा देह सोडून जातो. आत्महत्या करतो. शेतकरी आपल्यासाठी रक्त आटवतात. जर  ते आपली प्रत्येकाची जबाबदारी घेत असतील तर आपण त्याची जबाबदारी का घेऊ नये असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.”

आता फसवाफसवी खूप झाली, मी बँकांना तसेच विमा कंपन्यांना इशारा देतो की येत्या 15 दिवसात मला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत. अन्यथा 16 व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल असेही उद्धव यांनी सांगितले.

“माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं आहे. त्यावेळी त्यांनी सरकारने कर्जमाफीचे पैसे सरकारने जर बँकांना दिले तर मग ते पैसे गेले कुठे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाणिवेने शेतकऱ्यांसाठी फसल विमा योजना आणली असेल, तर त्याची जाणीव विमा कंपन्याना का नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“माझी सर्व बँकांना, विमा कंपन्यांना हात जोडून विनंती आहे, कृपा करुन आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मी तसेच शेतकऱ्यांनी घाबरु नका असेही सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे समर्थन केले.”

या मोर्चानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भारती एक्सा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात पुणे, परभणी, अकोला, सांगली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम आपल्याकडे जमा केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पण काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमाच्या प्रतिक्षेत आहेत. ही मोठी तफावत आहे. त्यामुळे यासोबबत परभणी जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची यादी जोडली आहे. तरी परभणीसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यातील रक्कम त्वरित दिली जावी असे लिहीले आहे. दरम्यान निवेदनानंतर आता विमा कंपन्याना काय निर्णय घेतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

LIVE उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा विमा कंपन्यांवर धडक मोर्चा