भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केलाय. कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. महत्वाची बाब म्हणजे विरोधकांच्या या दाव्याचा प्रत्ययही वेळोवेळी येतो. अशावेळी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केलाय. कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Jayant Patil and Sunil Tatkare’s reaction on allegations made by MLA Suhas Kande against Chhagan Bhujbal)

भुजबळ यांच्यावरील आरोपात तथ्य आहे असं मला वाटत नाही. अशी तक्रार करायची असेल तर सुहास कांदे यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असती तर त्याची शहानिशा करण्यात आली असती. पण कांदे कोर्टात गेल्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे यावर बोलणं योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे – तटकरे

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांनी पाठराखण केलीय. भुजबळ साहेब हे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही. आमदार सुहास कांदे यांच्या आरोपाबाबत आपल्याला नेमकी माहिती नाही. अनेक प्रयत्नानंतर राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. आघाडीत थोड्याफार कुरबुरी होऊ शकतात. राज्य पातळीवरच्या समन्वय समितीमध्ये या संदर्भात नक्की चर्चा होऊ शकते. मात्र, थेट न्यायालयात धाव घेतली असेल तर ते आघाडीच्या दृष्टीनं योग्य नाही. प्रश्न असू शकतात, चर्चा करावी लागेल. एकत्र बसून आघाडीच्या माध्यमातून यातून मार्ग काढला पाहिजे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय.

आमदार सुहास कांदेंचा नेमका आरोप काय?

छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा अंक थेट कोर्टात पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

सुहास कांदे-छगन भुजबळ यांची खडाजंगी

छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हा दौरा वादळी ठरला होता. कारण छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

इतर बातम्या :

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

तुळजाभवानीच्या दारातच भाविकांची लूट, भाविकांनी दान केलेल्या हजारो रुपयांवर डल्ला!

Jayant Patil and Sunil Tatkare’s reaction on allegations made by MLA Suhas Kande against Chhagan Bhujbal

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI