किरीट सोमय्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही- जयंत पाटील; देवेंद्र फडणवीसांनाही टोला

किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिली नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही जोरदार टोला लगावला आहे.

किरीट सोमय्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही- जयंत पाटील; देवेंद्र फडणवीसांनाही टोला
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शिर्डी : किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिली नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही जोरदार टोला लगावला आहे. शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही नेत्यांची जोरदार फिरकी घेतली. (Jayant Patil’s reply to BJP leader Kirit Somaiya’s allegations)

देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.

‘बुथ कमिट्या तयार करा, 2024 मध्ये चित्र वेगळे असेल’

दुसरीकडे अहमदनगरमध्ये बोलताना बुथ कमिट्या तयार करा, 2024 मध्ये या दोन्ही मतदारसंघात चित्र वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर आणि रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा पाटील यांनी घेतला. सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व राष्ट्रवादीत असून शरद पवारसाहेबांच्या रुपाने सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही असे सांगतानाच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा, फोन नाही उचलला तर मेसेज करा उत्तर नक्कीच मिळेल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, आदी उपस्थित होते.

जयंत पाटील, प्राजक्त तनपुरेंमध्ये जुगलबंदी

दरम्यान काल राहुरीत मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चांगलीच विकासात्मक बाबींवर जुगलबंदी उपस्थितांना पहायला मिळाली मतदारसंघाचा आढावा देत असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाची मागणी केली. याबाबत आधीच निर्णय झाला असून या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग 50-50 टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. यावेळी निळवंडे धरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिली तसेच 2024 पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल असेही त्यांनी आश्वासित केले. तनपुरे यांनी भागडा चारी प्रकल्प व इतर योजनांबाबतही आपली कैफियत मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.

‘तुमच्या मागण्या मान्य केल्या आता आमच्या निधीचाही विचार करा’

प्राजक्तदादा माझंही तुमच्याकडे काम आहे… तुमच्या मागण्या मान्य केल्या आता आमच्या निधीचाही विचार करा असे म्हणत जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांना गुगली टाकली. आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राहुरी मतदारसंघात जवळपास 200 ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. आमच्या भागाकडेही लक्ष असूद्या अशी मिश्किली जयंत पाटील यांनी केली. राहुरीतील या ‘परिवार’ संवादात दोन मंत्र्यांमध्ये रंगलेली ही जुंगलबंदी पाहत संपूर्ण सभागृहात हशा पिकला.

इतर बातम्या :

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात लवकरच केव्हाही निवडणूक लागू शकते : आशिष शेलार

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजितदादांची ग्वाही

Jayant Patil’s reply to BJP leader Kirit Somaiya’s allegations

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI